गडकरी रंगायतन येथे उद्या चार महाविद्यालयांमध्ये चुरस रंगणार

लोकसत्ता, ठाणे ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या महाविद्यालयांनी आपली एकांकिका अधिक प्रभावी करण्यासाठी अधिक जोमाने तालिम सुरू केली आहे.  गडकरी रंगायतन येथे उद्या, गुरुवार, १२ डिसेंबर रोजी या चार महाविद्यालयांमध्ये महाअंतिम फेरीत दाखल होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

तरुणांना एकांकिकेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची उद्या, १२ डिसेंबर रोजी ठाणे विभागीय अंतिम फेरी गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या चार महाविद्यालयांमध्ये राज्यस्तरीय अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात येणाऱ्या तालमीत विद्यार्थी आपली एकांकिका आणखी वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘भोकरवाडीचा शड्डू’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे.  एकांकिकेचा सराव दररोज सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सुरू आहे. तसेच एकांकिकेसाठी वेशभूषा ठरवण्याचे कामही दुसरीकडे सुरू आहे. ‘विभागीय अंतिम फेरीसाठी सर्वजण उत्सुक असून कलाकार जोमाने तालीम करत आहेत. काहीसे दडपण असले तरी विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीत दाखल होण्यासाठी सर्व कलाकार कसोशीने प्रयत्न करत आहेत,’ असे एकांकिकेतील कलाकार अजय पाटील म्हणाला.

उल्हासनगर येथील एस.एस.टी. महाविद्यालयाची ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. ‘प्राथमिक फेरीसाठी केवळ सहाच तास तालीम करत होतो, मात्र, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाल्यांनतर सलग बारा तास तालीम करत आहोत,’ असे या एकांकिकेतील आकाश सुर्वे म्हणाला.

उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या ‘हमीनस्तू’ या एकांकिकेची निवडही विभागीय अंतिम फेरीसाठी झाली असून स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत स्वतला सिद्ध करण्यासाठी कलाकारांपासून ते नेपथ्य करणाऱ्यांपर्यंत सर्वच जण वेगाने कामाला लागल्याचे या एकांकिकेतील कलाकार सिद्धेश मोरे याने सांगितले.

डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाची ‘सतराशे साठ दलिंदर’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. ठाणे विभागीय अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी समूहाची जोरदार तयारी सुरू असून नेपथ्यापासून ते अगदी वेशभूषेपर्यंत सर्वच गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात असल्याचे या एकांकिकेचा मार्गदर्शक किरण माने याने सांगितले. एकांकिकेच्या तालमीची वेळही वाढवण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकांकिकेचा सराव सुरू आहे. विशेष म्हणजे, सरावाच्या वेळेस एकांकिकेतील कलाकारांचे पालकदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. त्यामुळे पालक आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असल्याचेही किरण माने याने सांगितले.

प्रवेशिका २० मिनिटे आधी

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन येथे कार्यक्रम सुरू होण्याच्या वीस मिनिटे अगोदर उपलब्ध असणार आहेत.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकिज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ , ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे पावर्डबाय पार्टनर आहेत. तसेच, ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’ हे या स्पर्धेचे रिजनल पार्टनर आहेत. ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या कलाकारांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरीस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत आहे.