News Flash

दोन्ही टोल नाक्यांवर मध्यरात्रीपासून पुन्हा पथकर वसुली

वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

आनंदनगर आणि ऐरोली येथील सवलतीची मुदत संपली; वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ऐरोली आणि आनंदनगर पथकर (टोल) नाक्यांवर वाहनांचा भार वाढल्यामुळे होणारी कोंडी गणेशोत्सवाच्या काळात कमी करण्यासाठी गेले महिनाभर खासगी वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सवापर्यंतच लागू करण्यात आलेल्या या सवलतीची मुदत संपत आली असून रविवार (आज) मध्यरात्रीपासून दोन्ही नाक्यांवर पुन्हा पथकर वसुली सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

यामुळे गेल्या महिनाभरापासून पथकर नाक्यावरून खासगी वाहनांचा सुरू असलेल्या सुसाट प्रवासाला लगाम बसणार असून वाहनांना पथकर भरण्यासाठी दोन्ही नाक्यांवर थांबावे लागणार आहे. त्यामुळे या नाक्यांवर  कोंडी होण्याची शक्यता आहे. सोमवारी पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी झाली तर मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा ठाणे सिटिझन फाऊंडेशनने दिला आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, नवी मुंबई, कल्याण तसेच भिवंडी शहरातून वळविण्यात आली होती. आधीच गर्दीच्या वेळेत ऐरोली आणि आनंदनगर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असतानाच त्यात अवजड वाहनांची मोठी भर पडली होती. परिणामी, आनंदनगर पथकर नाका ते कोपरी पुलापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. ऐरोली आणि आनंदनगर या दोन्ही ठिकाणी पथकर भरण्यासाठी वाहनांना थांबावे लागत असल्याने कोंडी होत होती.

या कोंडीचा गणेशोत्सवाच्या काळातही ठाणेकरांना सामना करावा लागण्याची चिन्हे होती. त्यामुळे गणेशोत्सवपर्यंत दोन्ही नाक्यांवर खासगी वाहनांना पथकरातून सूट देण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीच्या आधारे राज्य शासनाने दोन्ही नाक्यांवर खासगी वाहनांना गणेशोत्सवापर्यंत पथकरातून सूट दिली होती.

महिनाभरासाठी देण्यात आलेली ही मुदत येत्या रविवारी संपुष्टात येत आहे. त्याचबरोबर चार महिन्यांच्या दुरुस्ती कामानंतर मुंब्रा बाह्य़वळण मार्गही दहा दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे गेले चार महिने दोन्ही पथकर नाक्यावरून सुरू असलेली अवजड वाहतूक आता मुंब्रा बाह्य़वळण मार्गे सुरू झाली आहे. असे असले तरी दोन्ही नाक्यावरून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत पथकर वसुलीमुळे या नाक्यावर कोंडी होते. असे असतानाच गणेशोत्सवापर्यंतच लागू करण्यात आलेल्या पथकर सवलतीची मुदत संपत आली असून रविवार मध्यरात्रीपासून पथकर वसुली सुरू करण्यात येणार आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे ऐरीली आणि आनंदनगर पथकर नाक्यावर खासगी वाहनांना टोलमाफी करण्यात आली होती. मात्र आम्हाला कायमची टोलमुक्ती हवी आहे. सोमवारी पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास आम्ही मंगळवारी ठाणे सिटिझन फाऊंडेशनतर्फे आंदोलन करण्यात येईल.    – कॅसबर ऑगस्टिन, संस्थापक, ठाणे सिटिझन फाऊंडेशन

ऐरोली आणि आनंदनगर पथकर नाक्यांवर खासगी वाहनांसाठी लागू असलेल्या टोलमाफीची मुदत रविवारी संपणार असून त्यामुळे रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा खासगी वाहनांकडून टोल आकारणी सुरू करण्यात येईल.      – शैलेंद्र बोरसे, कार्यकारी अभियंता-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने आनंदनगर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही, परंतु पथकर नाक्याच्या मार्गावरील अरुंद कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होऊ शकते.  – हेमलता शेरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 12:50 am

Web Title: financial scams at toll naka
Next Stories
1 टोमॅटोची ‘घाऊक’ स्वस्ताई
2 कल्याणच्या कुशीत नवे नगर
3 नाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त
Just Now!
X