X

पूरसंकट मानवनिर्मित!

गेल्या महिन्यात वसईत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती

नाले बुजवले, अनेक ठिकाणी बेकायदा भराव; पर्यावरण संवर्धक समितीकडून आरोप

दोन आठवडय़ांपूर्वी वसई-विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई जलमय झाली, मात्र हे संकट निसर्गाचे नव्हते, तर मानवनिर्मित होते, असे आढळून आले आहे. वसईतल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले, तसेच महामार्गही पाण्याखाली गेला होता. बेकायदा मातीभराव, बंद झालेले नैसर्गिक नाले आणि कचरा यांमुळे हे संकट निर्माण झाले आहे, असा आरोप पर्यावरण संवर्धक समितीकडून करण्यात आलेला आहे.

गेल्या महिन्यात वसईत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. एकाच दिवसात १८५ मिलिमीटर पाऊस पडला होता. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडालेला होता. संपूर्ण वसई जलमय झाली होती, पाऊस थांबला तरी साचलेल्या पाण्याचा पाच दिवस उलटूनही निचरा झालेला नव्हता. बहुतेक रस्ते पाण्याखाली जाऊन नागरिकांच्या घराघरात पाणी साचले होते. सर्व आदिवासी पाडे पाण्याखाली गेले होते. नानभाट, बोळिंज आणि नंदाखाल येथील घरातही पाणी साचले होते. नालासोपारा शहराच्या मुख्य भागात पाणी साचले होते. मुंबई अहमदाबाद महामार्गही दोन दिवस पाण्याखाली होता. अतिवृष्टी झाल्याने पाणी साचल्याचे सांगत प्रशासनाने सारवासारव केली आहे. परंतु वसई-विरारमध्ये आजवर जेथे पाणी साचले नव्हते, तिथे प्रथमच पाणी साचू लागले आहे. पाणी जाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत, तसेच मातीभराव करून इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच हे संकट आल्याचे वसई पर्यावरण संवर्धक समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले.  आम्ही अनेक वर्षांपासून याकडे शासनाचे लक्ष वेधून असा धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली होती. ती आज खरी ठरत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचते ही अत्यंत शरमेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. या मानवनिर्मित पूरपरिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून वसई पर्यावरण संवर्धक समितीने मूक मोर्चाही काढला होता.

प्रशासकीय चुकांमुळेच बळी

वसईत पावसाने ६ बळी घेतले होते. एका महिलेसह दोन दुचाकीस्वार नाल्यात वाहून गेले तर दोन दुचाकीस्वार तलावात बुडाले. तलावाचे पाणी पावसामुळे वाढले परंतु रस्त्यावरचे पाणी साचून तलावाच्या पातळीत आले. अशा वेळी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा नव्हती. तलावाचे प्रवेशद्वारही उघडे होते. किरवली गावातील महिला नाल्यात वाहून गेली. नालासोपारा येथे दोन दुचाकीस्वारही नाल्यात वाहून गेले होते. त्यामुळे या बळींनाही संबंधित सरकारी यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप समितीने केला आहे.

गावागावांमध्ये शिरणारे पाणी हे भविष्यातील महासंकटाची चाहूल देणारे आहे. या पावसात कधी नव्हे ते वसईतील आदिवासी पाडे जलमय झाले होते. आदिवासी पाडय़ांना गिळंकृत करण्यासाठी त्याच्याभोवतीची बांधकामे केली जात आहेत. हजारो टन मातीचा भराव केला जात आहे.

समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती

First Published on: October 5, 2017 3:54 am
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain