वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; भिवंडी-कल्याण-शीळ रस्ता सिमेंटने बांधणार

कल्याण-शीळ फाटा रस्त्यावरील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला कायमचा विराम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने या रस्त्यावर पत्रीपूल येथे अतिरिक्त तिसरा पूल, काटई नाका, मानपाडा चौक, सुयोग हॉटेल चौक येथे उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. शीळ फाटा-शिवाजी चौक ते भिवंडी बा’वळण रस्त्याचे सहापदरीकरण करण्याऐवजी हा डांबरी रस्ता सिमेंटने बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला. या दोन्ही पहिल्या टप्प्याच्या कामांसाठी ७७८ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

पत्रीपुलावरील जुना धोकादायक पूल पाडल्यानंतर बाजूच्या पुलावरून ये-जा करणारी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे खूप कोंडी या रस्त्यावर होत आहे. येत्या काळात दोन्ही पूल वाहनांसाठी अपुरे पडण्याची शक्यता असल्याने या दोन्ही पुलांच्या बाजूला वाढीव तिसरा पूल पत्रीपूल येथे बांधण्यात येणार आहे. या नवीन पुलाच्या उभारणीसाठी तसेच या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याच्या कामासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया महामंडळाने पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाडलेल्या धोकादायक पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर महामंडळाने प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या पत्रीपुलाचे काम हाती घेऊन ते १८ महिन्यांत बांधून पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पत्रीपूल येथील अस्तित्वातील पूल आणि आता नव्याने बांधण्यात येणारे उड्डाणपूल हे दोन पदरी आहेत. ऐरोली-काटई रस्ता, विरार-अलिबाग जलदगती मार्गिका सुरू झाल्यानंतर कल्याण-शीळ फाटा रस्त्यावरील वाहनांचा भार वाढणार आहे. या वेळी पत्रीपुलावरील दोन पूल हा वाढता वाहनांचा भार पेलवू शकणार नाहीत. या ठिकाणी पुन्हा वाहन कोंडी होऊ शकते म्हणून पालकमंत्री शिंदे यांनी पत्रीपूल येथे दोन्ही पुलांना समांतर तिसरा पूल बांधण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. ती संचालक मंडळाने तात्काळ मान्य केली. हे तिन्ही पूल कल्याण शहरातील अस्तित्वातील रस्त्यांना जोडण्यात येणार आहेत.

अंदाजपत्रकास महामंडळाची मंजुरी

भिवंडी-शीळ फाटा रस्ता उन्नत करण्याचा सुमारे एक हजार कोटींचा प्रस्ताव एमएसआरडीसीने यापूर्वी तयार केला होता; परंतु उन्नत रस्ता बांधताना अनेक तांत्रिक अडथळे, निवासी इमारती बाधित होण्याची शक्यता होती. त्यामुळे महामंडळाने यापूर्वीच हा निर्णय मागे घेतला आहे. हा सहापदरी डांबरी असलेला रस्ता सिमेंटकाँक्रीटने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ५४३ कोटी ६ लाखांची तरतूद केली आहे. या रस्त्यावर यापूर्वीच रुंदीकरण, नाले, गटारे, पृष्ठभाग उंचीकरणाची १८३ कोटींची कामे सुरू आहेत. शीळ फाटा-भिवंडी रस्ता विकासाच्या टप्पा दोनमधील मानपाडा चौक, सोनारपाडा चौक (हॉटेल सुयोग ते पेंढरकर महाविद्यालय) आणि काटई नाका (बदलापूर-शीळ रस्ता) या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या १९४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास महामंडळ संचालक मंडळाने मंजुरी दिली.

कल्याण- शिळफाटा रस्त्यावर पत्रीपूल, सुयोग हॉटेल चौक, मानपाडा नाका आणि काटई नाका येथे उड्डाणपूल उभारणार आहे.