ठाणे शहरापासून प्रक्रियेचा शुभारंभ

ग्राहकांना थेट धान्याचे वाटप करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने आधार कार्ड योजनेशी संलग्न होत बायोमेट्रिक ओळख पद्धतीने धान्य वितरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकेवर उपलब्ध होणारे धान्य वितरित करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन या पद्धतीनुसार डोळे आणि अंगठय़ाचा उपयोग केला जाणार असल्याने योग्य ग्राहकांपर्यंत धान्य वितरित होण्यासाठी या प्रक्रियेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय अन्न महामंडळातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होणाऱ्या धान्याची नोंद ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने साठेबाजीला यामुळे आळा बसणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ात या प्रक्रियेला सुरुवात होत असून अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी या ठिकाणी ही बायोमेट्रिक धान्य वाटप पद्धत लवकरच अवलंबली जाणार आहे.

योजनेचे फायदे

  • ऑनलाइन पद्धतीने धान्याची वाहतूक असल्याने तालुका गोदामात किती धान्य वितरित होते, यापैकी शिधावाटप दुकानदाराकडे किती जाते आणि ग्राहकांना धान्य किती उपलब्ध होते याची संपूर्ण नोंद अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे होईल.
  • ऑनलाइन धान्य वाहतुकीमुळे सामान्य जनतेलादेखील www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर धान्य वाहतुकीच्या संदर्भातील माहिती तपासता येणार आहे.
  • बायोमेट्रिक पद्धतीनुसार शिधावाटप दुकानात असलेल्या बायोमेट्रिक मशीनद्वारे अंगठय़ाच्या ठशावर शिधापत्रिकाधारक व्यक्तींची संपूर्ण माहिती दुकानदाराकडे उपलब्ध होणार असल्याने योग्य ग्राहकांकडे धान्य वितरित होणार आहे. निनावी व्यक्तीच्या नावावर धान्य घेण्याच्या प्रकाराला बायोमेट्रिक पद्धतीमुळे आळा बसणार आहे.

काय आहे ऑनलाइन धान्य वाहतूक?

केंद्र शासनातर्फे राज्यासाठी सर्वप्रथम धान्य निश्चित करण्यात येते. राज्याकडून भारतीय अन्न महामंडळाकडे धान्य वितरित केले जाते. भारतीय अन्न महामंडळाकडून अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे हे धान्य पाठवण्यात येते. पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे धान्य तालुका गोदामात वितरित करण्यात येते. १ जुलैपासून या सर्व धान्य वाहतुकीचे संगणकीकरण करण्यात आलेले असल्याने धान्य वितरित होण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. ऑनलाइन धान्य वाहतुकीत अंतर्भूत होणाऱ्या या दोन पातळ्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने पूर्णत्वास आल्या आहेत. तालुका पातळीवरून धान्य वितरित झाल्यानंतर ग्राहकांना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागात ४५ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या , तर शहरी भागात ५९ हजारपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ होणारआहे.

धान्य वाहतुकीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी राज्यभरात सर्वत्र १ जुलैपासून धान्य वाहतूक प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांच्या हक्काचे रक्षण व्हावे, धान्याचे योग्य वाटप ग्राहकांपर्यंत होण्याकरिता बायोमेट्रिक धान्य वाटप पद्धत सुरू करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागातर्फे घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्य़ात अल्पावधीतच ही प्रक्रिया सुरू करणार आहे.

 – डॉ. मोहन नळदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी