टोकवडे येथे कलाकुसर प्रशिक्षण सुविधा केंद्र

संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि सामूहिक वनहक्कान्वये राखण्यात आलेल्या जंगलामुळे मुरबाड तालुक्यातील वनसंपदेत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या जंगलांतील वनसंपत्तीचा योग्य विनीयोग व्हावा, आदिवासींना रोजगार मिळावा, यासाठी वन विभाग आणि जिल्हा प्रशासन गेली काही वर्षे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टोकावडे येथे लवकरच शासनाच्या आदिवासी विभागाच्या सहकार्याने वन विभागातर्फे पारंपरिक कलाकुसर प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र उभारले जाणार आहे.

मुरबाड तालुक्यात सुमारे १०० संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. गावपातळीवरील या समित्यांनी आपापल्या विभागातील जंगल संपदा उत्तम राखली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी उजाड माळ असणाऱ्या जमिनींवर हिरवाई फुलली आहे. आपापल्या हद्दीतील वनस्पतींची नोंदही गावपातळीवरील समित्यांनी ठेवली आहे. या जंगलात बांबू, पळस आणि कुडाची झाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. स्थानिक आदिवासी बांबूंपासून टोपल्या व कलाकुसरीच्या वस्तू बनवितात. टोकावडे येथील प्रशिक्षण केंद्रात या कारागिरांना बांबूपासून निरनिराळ्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बांबूपासून बनविलेल्या फर्निचरला सध्या चांगली मागणी आहे.

मुरबाडच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात मध मिळते. ते मध गाळण्याची यंत्रणाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. माळशेज घाटात येणारे पर्यटक तसेच या मार्गाने पुणे-नगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना या वस्तू खरेदी करता येतील. नाणेघाटाच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गालगत वन विभागाने यापूर्वीच स्थानिक जंगलात सापडणाऱ्या रानमेव्याची विक्री करण्यासाठी आदिवासींना बाजार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आदिवासींनी बनविलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, रानमेवा, हातसडीचे तांदूळ, वरी इत्यादी वस्तू त्यांना येथे विकता येणार आहेत, अशी माहिती वन अधिकारी तुळशीराम हिरवे यांनी दिली. नैसर्गिक साधनसंपत्तीपासून उपयुक्त वस्तू बनवण्याचे आणि तयार केलेल्या वस्तू विकण्याचे कौशल्य आदिवासी ग्रामस्थांना या एकाच केंद्रात आत्मसात करता येणार आहे.

पळसाच्या पत्रावळींना बाजारपेठ

पर्यावरणस्नेही जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे आता पळसाच्या पत्रावळींना बरीच मागणी आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पत्रावळी तयार करून त्या शहरी भागांत पुरविल्या जाणार आहेत. पत्रावळींबरोबरच चहाचे ग्लास, द्रोण इत्यादी वस्तूही येथे तयार केल्या जातील. प्लास्टिक आणि थर्माकोलला तो पर्यावरणस्नेही पर्याय ठरणार आहे.