कल्याण, डोंबिवलीत पहिल्याच दिवशी करोना नियमांचा विसर

कल्याण : करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बहुतांश व्यवहार सोमवारपासून सुरू झाले. सर्व दुकाने नियमितपणे खुली झाल्याने एकीकडे नागरिक, व्यापारीवर्गाला दिलासा मिळाला असला तरी, सोमवारी पहिल्याच दिवशी, शहरातील मुख्य बाजारपेठांत वाढलेल्या गर्दीने करोनाची भीती वाढवली आहे. करोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे या वेळी दिसून आले.

दोन महिन्यांच्या निर्बंधांनंतर सोमवारी कल्याण, डोंबिवलीतील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. शासन आदेशाच्या स्तर दोनमध्ये पालिकेचा समावेश करण्यात आल्यामुळे पालिका हद्दीतील सर्व प्रकारची दुकानांना खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठांसह शहरातील अंतर्गत भागांतही गजबज पाहायला मिळत होती. व्यापारी वर्गाने दुकानाबाहेर सॅनिटायझरची व्यवस्था केल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले. दुकानात गर्दी होऊ नये याकरिताही खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, नागरिकांच्या अतिउत्साहामुळे सर्वत्र गर्दी झाल्याचे दिसून आले.  कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरांतील बाजारपेठा भाजी विक्रेते, फेरीवाले, फळविक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे गजबजल्या आहेत. मुरबाड, शहापूर भागांतून खासगी वाहनाने सामानासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची शहरात गर्दी होती. लोकल प्रवासाला सामान्यांना मुभा नसल्याने बहुतांशी रहिवाशी, व्यापारी खासगी वाहने, दुचाकींनी शहरात आले होते. पुस्तकांच्या दुकानांमध्ये पालकांनी गर्दी केली होती. मुलांसह पालक खरेदीसाठी रांगेत होते. बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या होण्याचा सोमवारी पहिला दिवस असल्याने बाजारात, रस्त्यांवर कोंडी होऊ नये म्हणून जागोजागी वाहतूक पोलीस, पालिकांची पथके तैनात होती.

डोंबिवली परिसरातील बाजारपेठा सोमवारपासून पूर्णक्षमतेने सुरू झाल्या आहेत. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांनी वाहनतळाच्या ठिकाणी वाहन उभे करून मगच खरेदीसाठी  बाजारात यावे. थेट बाजारात येऊन वाहनकोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिला आहे. डोंबिवलीतील अनेक रिक्षाचालक मुख्य रस्ते, गल्लीत रिक्षा वाहनतळ नसताना रिक्षा उभा करून वाहतुकीला अडथळा होईल अशी कृती करीत आहेत. काही खासगी वाहनचालक रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला असताना विरुद्ध दिशेने येऊन कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे मार्गिकेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.