राष्ट्रीय बालविज्ञान स्पर्धेत चार प्रकल्पांची निवड; वैज्ञानिक तत्त्वाद्वारे समस्यांवर उपाय

शालेय वयात मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या बालविज्ञान परिषदेत यंदा ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातील एकूण सात प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्यातील चार प्रकल्प ठाणे जिल्ह्य़ातील आहेत. त्यात ठाणे शहरातील सिंघानिया शाळा, ए.के.जोशी इंग्रजी माध्यम शाळा, डॉ. बेडेकर विद्यामंदिर आणि शहापूर तालुक्यातील काटोरे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा समावेश  आहे.

प्रदूषण कमी करण्याचा उपाय

जलपर्णी आणि मिठाचा वापर करून सांडपाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी करून रेल्वे मार्गाशेजारी आरोग्यदायी पिके घेता येणे शक्य असल्याचे  ए.के.जोशी शाळेतील इयत्ता आठवीतील आयुष म्हात्रे, मिहीर जोशी, सिया चौधरी, ॠतुजा पाटणकर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पातून दाखवून दिले आहे.

विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळाच्या शेजारी वाहणाऱ्या सांडपाण्याची चाचणी केली असता त्यात अनेक घातक पदार्थ असल्याचे आढळले. त्यावर उपाययोजना म्हणून जलपर्णीचा वापर करण्यात आला. या प्रकल्पामध्ये जलपर्णी आणि सहज उपलब्ध असलेले मीठ हे पदार्थ वापरून सांडपाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण कमी होते, हे त्यांनी दाखवून दिले. भाजीपाल्याऐवजी या जागांवर फुलांची शेती करण्याचा उपाय विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सुचवला.

लोहाचे चॉकलेट

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया या आजारावर मात करण्यासाठी डॉ. बेडेकर विद्यामंदिरच्या सेजल रांगळे, वेदांत मंगरुळे, ओम पाटील या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतील निरनिराळ्या इयत्तांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अ‍ॅनेमिया संदर्भात चाचण्या घेतल्या. त्यानंतर स्पिरुलिना या शेवाळाच्या पावडरचा वापर करून स्पिरुलिना चॉकलेट्स तयार केले. याशिवाय शहापूर तालुक्यातील काटोरे येथील शासकीय आश्रमशाळेतील जया मेंगाळ, चेतना वाघचौडे, पूनम पोकळ, दीपाली रिकामे या विद्यार्थ्यांनी त्यावर मातीविना शेतीचा उपाय त्यांच्या प्रकल्पाद्वारे सुचविला आहे. शहरी शेती करण्यासाठी मातीला पर्याय म्हणून निरुपयोगी टाकाऊ वस्तूंचा वापर या प्रकल्पात करण्यात आला आहे.  साग, ऐन,  आंबा, तूस, लाकडाचा भुसा यांसारख्या टाकाऊ पदार्थाच्या कुंडय़ांमध्ये मोहरीच्या झाडांची यशस्वी लागवड विद्यार्थ्यांनी केली आहे.

मराठी शाळांकडून प्रतिसाद कमी

बालविज्ञान परिषदेत सहभागी झालेल्या एकूण शाळांपैकी मराठी माध्यमाच्या शाळांकडून आलेला प्रतिसाद फारच कमी असल्याची खंत बालविज्ञान परिषदेचे सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केली. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये इंग्रजी माध्यमाचे १६ प्रकल्प आहेत. मराठी माध्यमांच्या १३ प्रकल्पांपैकी शहरी भागातून फक्त दोन प्रकल्प आले आहेत. त्यातही ठाणे भागातील फक्त एकाच शाळेचा समावेश आहे.

तोंडावर मास्क हातात शिट्टी

दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर प्रदूषणामुळे गंभीर परिणाम होत असतात. तोंडावर मास्क असला तरी गाडय़ांचे नियंत्रण करण्यासाठी त्यांना शिट्टी वाजवावी लागते. त्यावेळी प्रदूषित हवा त्यांच्या तोंडात जाते. त्यावर उपाय म्हणून हाताने वाजणारी शिट्टी सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या तेजस्विनी देशमुख, समृद्धी शाह, सानिका चावरे आणि ध्रुव बजाज यांनी केली आहे.