ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकार

किशोर कोकणे- नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून २३ बेवारस मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, मंगळवारी शवागृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्यामुळे ठाणे आणि पालघर पोलिसांनी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये १२ मृतदेह ठेवण्याच्या क्षमतेचे शवागृह असून या ठिकाणी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर आणि रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेले बेवारस मृतदेह ठेवले जातात. तसेच जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस व्यक्तींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू करतात. तोपर्यंत त्याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात येतो. गेल्या सहा महिन्यांपासून १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेल्या शवागृहात तब्बल २३ मृतदेह ठेवण्यात आले होते.

या मृतांच्या नातेवाईकांचा शोध लागत नव्हता आणि पोलिसांकडून बेवारस मृतदेहघोषित करूनही अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी वेगाने हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हे मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत होते. तसेच शवागृहात क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवल्यामुळे दुसरे मृतदेह ठेवणे शक्य होत नव्हते.

दरम्यान, मंगळवारी रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याची बाब रुग्णालय प्रशासनाने ठाणे, पालघर आणि रेल्वे पोलिसांना पत्र पाठवून कळविली. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अन्य एका मृतदेहावर आज, गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यंत्रणा बंद पडल्याची अफवा? : रुग्णालयातील शवागृहामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून २३ बेवारस मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत होते आणि पोलिसांकडूनही बेवारस मृतदेह घोषित करून अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी हालचाली होत नव्हत्या. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठीच वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याची अफवा रुग्णालय प्रशासनाने उठवल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. याबाबत रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत त्यांनी मात्र मौन बाळगले. तसेच शवागृहात वातानुकूलन यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्याबाबत कळविले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.