मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. परंतु त्याने हुरळून गेलो तर संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल आणि कौतुकाने हुरळून जाऊन गाफील राहता येणार नाही. त्यामुळे अन्य राज्यांनी काही गोष्टी घाईगडबडीने केल्या असल्या तरी मात्र महाराष्ट्र तसे करणार नाही. जोवर खात्री पटत नाही तोवर काही निर्बंध शिथिल करता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात स्पष्ट केले.

आपण यापूर्वी बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र उर्वरित काही गोष्टी सुरू करता येणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काही निर्बंध आणखी काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही  पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली.  बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिन डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

आगामी काळ अधिक कसोटीचा असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मुंबई महानगर प्रदेशात काही दिवस रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु गेल्या महिन्याभरात सर्वानीच खंबीरपणे साथीचा मुकाबला केला. साथ नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. परंतु कुणीही गाफील राहू नये, असे त्यांना बजावले आहे. याचे कारण गाफील राहिल्यानंतर दुसरी लाट उद्भवली, असा जगभरातील अनुभव आहे. आपण जागृत राहिलो तर ही लाट टाळता येईल.’’

कसोटीचा काळ!

ज्या गोष्टी आपण सुरू केल्या त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण काही गोष्टींवरील निर्बंध हटवता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेकांच्या बाबतीत करोना विषाणू संसर्गाच्या १५ दिवसांनंतर लक्षणे दाखवतो. त्यामुळे आताचा काळ कसोटीचा आहे. आकडे कमी होत आहेत म्हणून हुरळून जाऊ नका. गणेशोत्सव आणि अन्य धर्मीयांचे उत्सवही सुरू आहेत. आकडा कमी होतोय म्हणून आपण गर्दी करायला लागलो तर नव्या संकटाला आमंत्रण देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.