02 March 2021

News Flash

खाऊखुशाल : आजीच्या हातची लज्जत

संकष्टीला येथे गरमागरम आणि लुसलुशीत मोदक मिळतात.

आधुनिक युगात नवनवे खाद्यपदार्थ उपलब्ध असले तरी पारंपरिक खाद्यपदार्थाची गोडी अवर्णनीय आहे. ते रुचकर असतातच, शिवाय पौष्टिकही असतात. हल्ली धावपळीच्या युगात असे पदार्थ बहुतेक घरांमध्ये बनविले जात नाहीत. त्यामुळे असे पदार्थ उपलब्ध असणाऱ्या स्टॉल्सवर खवय्यांची झुंबड उडताना दिसते.

अशाच प्रकारे आजी आणि आईच्या पारंपरिक पदार्थाचा अनमोल ठेवा डोंबिवली येथील पंडित किचन्स यांनी जपला आहे. उडपी, जैन, चायनीज पदार्थाप्रमाणेच मराठमोळ्या थाळीमध्येही कमालीचे वैविध्य असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात येते. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने पंडित किचन्समध्ये मराठमोळे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली आहे. श्रावणी सोमवार व शनिवारी उपवासाची मिसळ या पदार्थाला अधिक प्रमाणात मागणी आहे. या उपवासाच्या मिसळमध्ये साबुदाणा खिचडी, शेंगदाणे उसळ, बटाटे, दाण्याची आमटी, ताक आदी पदार्थ एकत्र केले जातात. खुशखुशीत आणि कमी तेलात तळलेले हे साबुदाणे वडेही येथे मोठय़ा प्रमाणात संपतात. येथील खास पदार्थ म्हणजे भाजणीचे वडे, भाजणीचे थालीपीठ. एका ताटात पाच वडे आणि दोन थालिपीठे दिली जातात. भाजणीच्या वडय़ाबरोबर उसळी मिरची हा अत्यंत चविष्ट पदार्थ तोंडी लावण्यास दिला जातो. उसळी मिरची म्हणजे थोडक्यात मिरचीचे लोणचे. हे लोणचे अमोद पंडित स्वत:च्या घरी तयार करतात. यामध्ये मिरची, मोहरी, घरगुती लोणचं, मसाला आदी जिन्नस एकत्र करून त्यात थोडे गरम तेल टाकले जाते. घरगुती लोणच्याची चव खाताक्षणी लक्षात येते. एका ताटात ५ वडे दिले जातात. संकष्टीला येथे गरमागरम आणि लुसलुशीत मोदक मिळतात. एक मोदक १७ रुपयेप्रमाणे विकला जातो. तसेच ऑर्डरप्रमाणे मँगो मोदकही तयार करून दिले जातात. दररोज येथे ताज्या दुधाचा खरवस तयार केला जातो. मोठी पुरणपोळी आणि त्याच्याबरोबर दूध आणि तूप हा अस्सल मराठमोळा बेत येथे उपलब्ध आहे. अळुवडी, कोंथिबीर वडी, मूगभजी, कांदाभजी आदी पदार्थाना तर खवय्ये अधिक प्रमाणात पसंती देतात.  पंडित किचन्स येथील सर्व मसाले घरच्या घरी तयार केले जातात. महिन्याला पाच किलो मसाले सहज लागत असल्याचे त्यांनी सांगितले. बटाटे आणि वरीचे पीठ वापरून येथे उपवासाचे थालिपीठही केले जाते. त्यावर मस्त लोणी किंवा तूप घातले की या पदार्थाचा स्वाद अधिकच वाढतो.

मुळातच हे पोळी-भाजी केंद्र असल्याने येथे गरमागरम आणि लुसलुशीत पोळ्या आणि भाजी  सदैव उपलब्ध असतेच, शिवाय वांग्याचं भरीत हा येथील एक खास पदार्थ आहे. वांग्याचं भरीत आणि येथील भाकरीलाही अनेकांनी पसंती दर्शवली आहे. सोलकढी, ताक प्यायलाने थंडावा तर मिळतोच पण पचनक्रियाही हलकी राहण्यास मदत होते. ताकासोबत गप्पा छान रंगतात. अनेक जण येथे येऊन लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे आदी घरगुती थंड पेयांचा आस्वाद घेतात. सरबत पिताना गप्पांनाही सरबताचा आंबट-गोडपणा अगदी हमखास येतो. येथे बाहेर बसायला थोडी जागा असल्याने आरामात बसून खाता येते. सकाळी पोहे, उपमा यांचा नाश्ताही येथे मिळतो. त्यामुळे येथे सकाळीही खवय्यांची गर्दी असते. येथे मिळणारी कॉर्न भजी तसेच मटार पॅटिस हे पदार्थही अतिशय रुचकर आहेत.

कुठे- एमआयडीसी कॉलनी, एम्स हॉस्पिटलसमोर, डोंबिवली (पूर्व)

वेळ- सकाळी ८.३० ते ३.३०, संध्याकाळी ६ ते १०.३० वाजता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:31 am

Web Title: grannys hands food in dombivali
Next Stories
1 भाईंदर स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा
2 अंबरनाथमध्येही ‘होम प्लॅटफॉर्मची’ मागणी
3 फेरीवाल्यांना २४ तासांची मुदत
Just Now!
X