News Flash

समूहचित्राकडून सेल्फीकडे..!

आमच्या लहानपणी घराघरात आढळणारी एक सामाईक बाब असे. ती म्हणजे प्रत्येकाच्या घरात भिंतीवर टांगलेली किमान एक फोटोफ्रेम.

| August 20, 2015 03:35 am

भूतकाळाचे वर्तमान

समूहचित्राकडून सेल्फीकडे..!
आमच्या लहानपणी घराघरात आढळणारी एक सामाईक बाब असे. ती म्हणजे प्रत्येकाच्या घरात भिंतीवर टांगलेली किमान एक फोटोफ्रेम. या फ्रेममध्ये बहुधा घरातील एखाद्या वयोवृद्धाचा फोटो असे किंवा मग कुटुंबातील सर्वाचा ग्रुप फोटो असे. कधी तरी हे लक्षात येई, तेव्हा आम्ही घरातील एखाद्या मोठय़ा माणसाला विचारत असू की फ्रेममधला तो फोटो कुणाचा? ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ प्रकारचा तो फोटो असे. लहानपणी फोटोशी संबंध हा एवढाच यायचा. हे फोटो कोण काढतात, कसे काढतात, असे प्रश्न बालमनाला पडत. पण ते तेवढय़ापुरतेच. मला तो आगळावेगळा दिवस आठवतो- अगदी लख्खपणे. त्या दिवशी आम्हा सर्व भावंडांना घेऊन बाबा फोटो काढायला म्हणून घेऊन गेले. त्याचे नाव मीना फोटो स्टुडिओ. आत शिरता शिरताच त्या लांबट, अरुंद हॉलमध्ये सभोवार मांडलेल्या वस्तू आणि फर्निचरची रचना पाहून आम्ही अगदी भांबावून गेलो होतो. एका भिंतीवरच्या पडद्यावर एक सुरेख रंगीत बागेचा देखावा होता. उजवीकडच्या भिंतीवरील चित्रात एक मोठे विमान स्थिरावले होते. एका कोपऱ्यातील घडवंचीवर कागदाच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले, कळशीसारखे पितळ्याचे एक चकचकीत भांडे होते. दुसऱ्या कोपऱ्यात लोखंडी स्टॅण्डवर ठेवलेले दोन मोठय़ा आकाराचे दिवे होते. एका बाजूला लोखंडी मजबूत तिपाईवर एक चौकोनी पेटीसदृश वस्तू. तिला मधोमध एका घडीघडीच्या जाडसर काळ्या मेणकापडाच्या कैचीत बसवलेले काचेचे मोठे भिंग बसवल्यासारखे दिसत होते. आम्ही ती सारी मांडणी अधाशासारखी पाहत होतो. जणू काही त्याची भूल आमच्यावर पडली होती. कोणाचा आणि कसा फोटो घ्यायचा यासंबंधी बोलणे झाल्यावर आम्हा सगळ्यांना (म्हणजे तिघांना) एका विशिष्ट क्रमाने जवळजवळ उभे केले. दोन्ही बाजूंनी भस्कन पेटलेल्या दिव्यांमुळे आमचे डोळे क्षणभर मिटले. मग त्याने (फोटोग्राफरने) काळ्या कपडय़ाने जणू झाकलेल्या त्या पेटीमागे जाऊन स्वत:च्या डोक्यावरून नखशिखांत झाकणाऱ्या काळ्या कापडात डोके खुपसले. मग कापडाच्या एका बाजूने उजवा हात बाहेर काढून त्या पेटीला बसविलेले भिंग डावी-उजवीकडे फिरवत आम्हाला स्तब्ध उभे राहण्यास सांगितले आणि मग क्लिक. त्यानंतर जवळजवळ आठवडाभराने आम्हाला आमचे फोटो पाहायला मिळाले. त्या वेळी आम्हाला झालेला आनंद अवर्णनीय होता.
पुढे काही वर्षांनी, इयत्ता नववीत गेल्यावर या कॅमेऱ्याची आंतररचना व कार्य यासंबंधी एक संक्षिप्त पाठ विज्ञानाच्या पुस्तकात अभ्यासायला होता. आकृतीसह उत्तर लिहिले की हमखास चारपैकी चार गुण मिळायचे. त्यामुळे कॅमेरा या वस्तूबद्दल आमचा आदर आणि प्रेम द्विगुणित झाला.
असाच आनंदाचा क्षण मग पुढे आणखी दोन वर्षांनी आम्हाला शाळेत अनुभवायला मिळाला. तत्कालीन अनेक शाळांमधून हा उपक्रम रूढ होता. तो दिवस एस.एस.सी. वर्गातला शाळेतला शेवटचा दिवस. आमच्या शाळेत ती परंपरा पडून गेली होती. एस.एस.सी. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे गटागटाने फोटो घेतले जायचे; आणि सर्व इच्छुकांना त्याची प्रत अगदी अल्प मोबदल्यात उपलब्ध व्हायची.
फोटोग्राफीची विद्यार्थीदशेत झालेली ही जुजबी जान-पहचान पुढे पावशतक लोटल्यानंतरही चांगलीच उपयोगी पडली, नव्हे तिने मला चांगलेच छांदिष्ट बनविले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सदस्यत्वामुळे निसर्गछायाचित्रणाचे माझ्या पिढीतल्या अनेकांना जणू वेड लागले. मात्र त्या काळात फोटोग्राफी हा स्वस्तात होणारा छंद नव्हता. विशेषत: निसर्ग छायाचित्रण हा आजकाल जितका सार्वत्रिक छंद झाल्यासारखा दिसतो, तसा तर तो अजिबात नव्हता. माझ्या पिढीतल्या अनेकांनी हा छंद मोठय़ा हालअपेष्टा सोसून चालू ठेवला. लाइका, हनिमॅक्स, अगफा, फूजी अशा कंपन्यांचे कॅमेरे आणि टेलिलेन्सेस अतिशय महागडे असत. या ब्रॅण्डचे नवे कॅमेरे घेणे परवडणारे नसे. धडपड करून आडगिऱ्हायकी ते मिळवायचे हाच एक मोठा उद्योग होता. त्यांच्या मॅचिंग टेलिलेन्सेस मिळविणे हे तर महाकठीण. यावर आम्ही एक मध्यमवर्गीय तोडगा शोधून काढला होता. कलर फोटोग्राफी फारशी न करता आम्ही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोग्राफी करीत असू. याचा एक महत्त्वाचा फायदा आमच्या पिढय़ांना मिळाला. कारण अशी फिल्म डेव्हलप करणे आणि त्यावरून चित्रांचे प्रिंटिंग करणे ही दोन्ही कामे घरच्या घरी करता येत असत आणि तीही बऱ्यापैकी स्वस्तात. त्यासाठी सुरुवातीला आम्ही काही जुजबी केमिकल्स आणि यंत्रसामग्री बाजारातून घेऊ शकत होतो. ‘अपना हाथ जगन्नाथ.’ आज मागे वळून पाहिले की धडकीच भरते. इतका तो जीवघेणा प्रकार होता.
इ.स. १९९०चे दशक हे फोटोग्राफीच्या छंदाच्या दृष्टीने महत्त्वाचे दशक ठरले. तेव्हा सुरू झालेली फोटोग्राफीमधील क्रांती ही कुठे थांबेल हे सांगता येणे अशक्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कॅमेराचे वजन अतिशय कमी झाले आहे. पूर्वी चार-सहाशे ग्रॅम वजनाची फक्त टेलिलेन्स असायची. ती ज्याला लावायची त्या कॅमेराचे वजन वेगळे. एवढे वजन दोन हातात पेलून हाताला जर्क बसू न देता क्लिक करण्याचे अशक्यप्राय वाटणारे काम माझ्या पिढीने केले आहे.
डिजिटल कॅमेरे आल्यानंतर छायाचित्रण हा कलेला आता खरोखरच ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. तंत्र सुधारणेच्या या लाटेत फोटोग्राफरवर ‘पडणारे’ वजन कमी कमी होत चालले आहे आणि आता तर चार इंची मोबाइल फोनमध्ये टेलिलेन्सचा परिणाम साधणारे अत्यंत कार्यक्षम कॅमेरे अंतर्भूत झाल्यामुळे केवळ आपल्यासमोर असलेल्या अगदी सूक्ष्मतर विश्वाचे छायाचित्रण तर करता येतेच, पण ‘सेल्फी’सुद्धा घेता येते. आता यापुढे काही बाकी आहे का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:35 am

Web Title: group photos and selfie
Next Stories
1 बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
2 परिश्रम करून यश मिळवा!
3 वजन-मापे दलालावर गुन्हा दाखल
Just Now!
X