05 July 2020

News Flash

महावितरणचे मीटर सुसाट!

मागच्याच महिन्यात वीजदरवाढीचा झटका दिल्यानंतर आता ‘महावितरण’ने ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मनमानी वीजबिल आकारण्याचा उद्योग सुरू केला आहे.

| January 29, 2015 08:56 am

मागच्याच महिन्यात वीजदरवाढीचा झटका दिल्यानंतर आता ‘महावितरण’ने ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मनमानी वीजबिल आकारण्याचा उद्योग सुरू केला आहे. वीजवापराची नोंद करण्यासाठी छायाचित्रांसारखी पारदर्शक व्यवस्था आल्यानंतरही खोटे छायाचित्र वापरून १०० ते १२५ युनिट जादा वापर दाखवत ग्राहकांच्या माथी जवळपास दुप्पट रकमेची बिले मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीत वाढीव वीजबिलाच्या तक्रारी येत असून एका ग्राहकाच्या जागरूकतेमुळे ‘महावितरण’ची बनवाबनवी उघडी पडली आहे.
वीजवापराच्या चुकीच्या नोंदी करून मीटरवाचन करणारे ग्राहकांवर वाढीव बिलाचा भरुदड लादत असल्याच्या तक्रारी पूर्वी होत असत. त्यावर उपाय म्हणून मीटरचे छायाचित्र काढण्याची पद्धत सहा-सात वर्षांपूर्वी ‘महावितरण’ने सुरू केली. ही पारदर्शक पद्धत असल्याने त्यामुळे चुकीच्या वीजबिलाच्या तक्रारी कमी झाल्या. पण आता ‘ये रे माझ्या मागल्या’ असा कारभार सुरू झाला आहे. ग्राहकांच्या वीजबिलावर छापण्यात येणारे मीटरचे फोटोच चुकीचे असल्याचे दिसून आले आहे.
डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या एका ग्राहकाला या वेळी १४०० रुपयांचे वीजबिल आले. दरमहा सुमारे ५००-६०० रुपये वीजबिल येत असताना अचानक दुप्पट वीजबिल कसे याचे आश्चर्य वाटल्याने या ग्राहकाने एकूण वीजवापर हा रकाना पाहिला असता त्यावर तब्बल १९५ युनिटची नोंद होती. ‘चालू मीटर रीडिंग’ या रकान्यात ७९४५ ही संख्या होती. सरासरी ८० ते १०० युनिट वीजवापर असताना अचानक दुप्पट वीजवापर कसा, असा प्रश्न निर्माण झाला. वीजबिल भरल्याशिवाय तक्रारीची नोंद घ्यायची नाही, अशी ‘महावितरण’ची उफराटी भूमिका असल्याने या ग्राहकाने ऑनलाइन वीजबिल भरणा केला. त्यानंतर इमारतीच्या तळमजल्यावरील वीजमीटर तपासले असता, त्यावर ७८९० अशी संख्या दिसली आणि ‘महावितरण’च्या ‘फोटो मीटर रीडिंग’चे बिंग फुटले. वीजबिल आल्यानंतर १२ दिवसांनी ७८९० वीजवापर असेल तर तो १२-१५ दिवस आधीच मीटरने ७९००चा टप्पा कसा ओलांडला? म्हणजेच छायाचित्र घेणाऱ्यांनी वा ‘महावितरण’च्या यंत्रणेने चुकीचा फोटो टाकत वीजवापर जवळपास १०० युनिटने वाढवून दाखवला होता.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर या ग्राहकाने वीजबिलाचे छायाचित्र आणि मीटरवरील सध्याच्या वीजवापराचे आकडे यांचे मोबाइलवर छायाचित्र टिपले आणि ते ‘महावितरण’च्या जनसंपर्क विभागाला पाठवले. ‘आम्ही लगेच याची दखल घेऊ’ असे उत्तर त्याला देण्यात आले.
दरम्यान, पारदर्शक प्रणालीमुळे वाढीव बिल आकारणीच्या तक्रारी थांबण्याची गरज होती. तक्रारींची संख्या कमी झाली असली तरी या स्वरूपाच्या तक्रारी आजही येत आहेत. या तक्रारींचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.

तक्रारींची दखल घेऊ
वाढीव स्वरूपाचे वीजबिल ग्राहकांना देण्यात आले असल्यास आणि त्याची तक्रार मिळाल्यानंतर त्याची सत्यता पडताळून ग्राहकांना योग्य बिल देण्यात येते. तसेच जास्तीचे पैसे आकारले गेल्यास पुढील बिलांमध्ये त्याची तडजोड केली जाते. महावितरणच्या वतीने खासगी संस्थांकडे वीज मीटर रीडिंगचे काम देण्यात येत असते. ग्राहकांनी या संदर्भात तक्रारी दिल्या आणि चौकशीतून या कामामध्ये निष्काळजीपणा होत असल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल.
भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण कल्याण झोन

वीजग्राहकांनो लक्ष द्या
* प्रत्येक महिन्याचे वीजबिल येताच अगदीच वीजवापर वाढला नसेल तर ते सरासरीच्या जवळपास आहे की नाही याची खातरजमा करा.
* बिलावर छापलेला वीजवापर आणि प्रत्यक्षात मीटरवरची नोंद तपासा. ती जुळत नसल्यास तातडीने तक्रार करा.
* अनेकदा लोक मीटरचे छायाचित्र आहे म्हणून आले ते वीजबिल भरून मोकळे होतात. त्याचाच गैरफायदा घेतला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2015 8:56 am

Web Title: heavy amount of mahavitran electricity bills in thane
टॅग Mahavitran,Thane
Next Stories
1 टीएमटीवर खाकीचा भार
2 जीर्ण विद्युत खांबांचा ठाणे पालिकेकडून शोध
3 चावा घेणाऱ्या कुत्र्याची रवानगी गावाकडे
Just Now!
X