आनंदनगर टोलनाक्याजवळ नाकाबंदी केल्याचा परिणाम; नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

ठाणे : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वाहतुकीसाठी काही नियम आखून देण्यात आले असून हे नियम पायदळी तुडविणाऱ्यांविरोधात ठाणे आणि मुंबई पोलिसांनी रविवारपासून कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोमवारी सकाळी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर टोल नाक्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करून विविध सवलती देऊ केल्या. त्यामध्ये दुचाकीवरून एकाच व्यक्तीने तर कारमध्ये चालक आणि दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र अनेक जण या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. त्यातच शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आणि मुंबई पोलिसांनी आनंदनगर नाक्यावर सोमवारी सकाळी नाकाबंदी करून कारमधून नियमापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहेत का, तसेच विनाकारण नागरिक कारने प्रवास करीत आहेत का, याची तपासणी सुरू केली. ऐन सकाळच्या वेळेत केलेल्या नाकाबंदीमुळे आनंदनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दुचाकीवर दोन प्रवासी तसेच कारमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करीत होते.

या कारवाईसाठी वाहने रोखून धरली जात होती. त्यामुळे ठाण्यातील तीन हात नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहचल्या होत्या. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागत होता. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले.

विनाकारण फिरणाऱ्यांवर बडगा

नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने नाकाबंदी केली जाणार असल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी रविवारी दुपारी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सकाळपासून ठाण्यातील कोपरी आनंदनगर नाका, एलबीएस रोड, शिळ-डायघर, कल्याण-डोंबिवलीतील शिवाजी चौक, दुर्गाडी पूल, या ठिकाणी नाकाबंदी होती. या नाकाबंदीचा सर्वाधिक परिणाम कोपरी-आनंदनगर नाक्यावर झाला. ठाण्यातून अनेक जण मुंबईत कामावर जाण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करतात. मात्र, सोमवारी सकाळी ठाणे आणि मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केल्याने आनंदनगर आणि मुलुंड चेक नाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या कारवाईदरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या चालकांना पोलीस माघारी परतवून लावत होते.