निवडणुकीच्या धामधुमीत कल्याण, डोंबिवलीत जोमाने बेकायदा बांधकामे; बडय़ा राजकारण्यांच्या दबावामुळे प्रशासनही गप्प

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, दिवा या शहरांतील भूमाफियांनी आपले उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या कामात पोलीस व प्रशासकीय यंत्रणा व्यग्र असल्याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी बेकायदा इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. त्यातच मतांच्या गणितावर डोळा ठेवून काही बडय़ा राजकीय नेत्यांनी या बांधकामांना अभय मिळवून दिल्याचीही चर्चा आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सरकारी, खासगी भूखंडावर कोणत्याही परवानगीविना अवघ्या ४०-४५ दिवसांत टोलेजंग बांधकामे उभी करण्यात येत आहेत. महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार हे प्रभारी आयुक्त म्हणून कारभार सांभाळत आहेत. पालिकेचे सर्वच प्रभाग अधिकारी व वरिष्ठ पालिका अधिकारी निवडणूक कामांत व्यग्र आहेत. त्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे.

बेकायदा बांधकामे सुरू असतानाच त्यातील घरांच्या जाहिराती समाजमाध्यमांवरून प्रसारित केल्या जात आहेत. परवडणाऱ्या घराच्या शोधात असलेली अनेक सर्वसमान्य कुटुंबे स्वस्त घरांच्या लालसेने या बेकायदा इमारतींत घरखरेदी करत आहेत. विशेषत: शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या बांधकामांच्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘वन रूम किचन’ घरासाठी ३०-३५ लाखांचा दर सुरू असल्याचेही समजते. बनावट कागदपत्रे, सही-शिक्के करून ही घरे सर्रास विकली जात आहेत. शिवाय नोंदणीकरणाशिवाय येथील घरांचे व्यवहार होत असल्याचे समजते.

बांधकामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह

बेकायदा इमारत बांधताना तिच्या मजबुतीकडेही पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. इमारत बांधताना सिमेंटमध्ये वाळू ऐवजी ग्रीट (दगडाची भुकटी) टाकली जाते. सीमेंट, दगड भुकटी हे मिश्रण बांधकामाला अयोग्य आहे. हे बांधकाम पाच ते सहा वर्षांच्यावर टिकत नाही. मात्र, तरीही भूमाफियांकडून अशी दर्जाहीन व धोकादायक ठरू शकणारी बांधकामे केली जात आहेत.

सत्ताधारी नगरसेवकांची मागणी दुर्लक्षित

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका अधिकाऱ्यांना पत्र देऊन निवडणूक काळात बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत म्हणून खबरदारी घेण्याची सूचना केली होती. पण त्यांची सूचनाही केराच्या टोपलीत पडली आहे. याऊलट वामन म्हात्रे यांच्या प्रभागात चाळी तोडून बेकायदा इमारती बांधण्याची मोठी स्पर्धा माफियांमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येते.