कोठारी कम्पाऊंड परिसरात दुमजली बांधकामांची उभारणी; महापालिकेचा कानाडोळा

नव्या ठाण्यातील उच्चभ्रूंची वसाहत अशी ओळख असलेल्या ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील कोठारी कम्पाऊंड परिसरात काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांची उभारणी सुरू असून लाउंज बार, हुक्का पार्लर तसेच बडय़ा हॉटेलांची बिनदिक्कत उभारणी सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

पालिकेमार्फत ग्लॅडी अल्वारिस मार्गाची बांधणी मॉडेल रोडच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करता यावे यासाठी पालिकेने मध्यंतरी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. असे असले तरी याच ठिकाणी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता दुमजली बांधकामांची उभारणी सुरू आहे.

अल्वारिस मार्गालगत असलेल्या कोठारी कम्पाऊंडची जागा गोदामांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र, मूळ मालकाला न जुमानता या ठिकाणी मनमानी पद्धतीने बांधकाम केले जात असल्याने त्याविरोधात डाह्य़ाभाई अ‍ॅण्ड कंपनी प्रा. लि. यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत असून काही बडे राजकीय नेते तसेच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याची चर्चा रंगू लागली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील अवैध धंदे सुरू असणाऱ्या बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई केली होती. अशाच एका कारवाईदरम्यान उपवन परिसरात शेकडो खोल्यांचा अवैध लॉज सापडला होता.  बेकायदा बांधकामांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या बारना अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला नाही. येथील अंतर्गत व्यवस्था अत्यंत दाटीवाटीची असल्याच्या तक्रारी अतिक्रमण विभागाकडे आल्या असून या तक्रारींकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याची चर्चा आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने

बेकायदा बांधकामांमध्ये हॉटेल किंवा अन्य आस्थापनांना ना-हरकत दाखला दिला जाऊ नये असा निर्णय यापूर्वीच महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या पत्रानंतरही येथील बांधकामांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा लाउंज तसेच पब बारना उत्पादन शुल्क विभागाचे परवाने कसे मिळाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे वर्षभरात अग्निशमन विभागाचे ना-हरकत दाखला मिळवू असे पत्र घेऊन या बारमालकांना परवाने दिले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक नाना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी संबंधित आस्थापनांचे कागदपत्र तपासणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कागदपत्रांची तपासणी करून  अवैध आढळून आल्यास येथील लाउंज बार तसेच पबवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.