डोंबिवलीत देवीचापाडा खाडी भागात वाळू माफियांचा धुडगूस

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडीकिनारी भागात गेल्या पाच दिवसांपासून दोन अवाढव्य ड्रेजर वाळू माफियांनी आणून ठेवले आहेत. या ड्रेजरच्या साहाय्याने दिवसरात्र रेतीचा बेकायदा उपसा सुरू असून ही वाळू तात्काळ लहान बोटींद्वारे खाडीकिनारी आणून ती डम्परमधून इतर भागांत लपविण्यासाठी किंवा विक्रीसाठी पाठविली जाते, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहेत.

ठाणे जिल्हा प्रशासनाने खाडीकिनारी भागात वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे गेल्या पाच ते सहा वर्षांत कंबरडे मोडले आहे. त्यांच्या यंत्रणेची नासधूस करून खाडीत फेकून दिली जात आहे. यामुळे वाळू माफिया खाडीतून रेती उपसा करण्यास घाबरत होते. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांत डोंबिवलीतील रेतीबंदर, मोठागाव, देवीचापाडा, गणेशनगर, नवापाडा भागांत रेतीचा उपसा वाळू माफियांकडून झाला नाही. त्यामुळे या भागातील खाडीकिनारी आणि पाण्याच्या मध्य भागात वाळूचे पाट तयार झाले आहेत. ही साचलेली वाळू उपसा करण्यासाठी माफियांनी आता प्रथमच ड्रेजर या भागात आणून उभे केले आहेत. या दोन्ही ड्रेजरच्या साहाय्याने दिवस-रात्र वाळू उपसा करण्याचे काम सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात जिल्हा महसूल यंत्रणा व्यस्त आहे. या संधीचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर मोठागाव, गणेशनगर, देवीचापाडा भागातील खाडीकिनारी लहान-मोठय़ा बोटींद्वारे, सक्शन पंप आणि ड्रेजरद्वारे वाळू उपसा सुरू केला आहे. या ड्रेजरच्या अवतीभवती उपसा झालेली वाळू तात्काळ खाडीकिनारी आणण्यासाठी लहान बोटी उभ्या करण्यात आल्या आहेत. ही वाळू डम्परमध्ये भरून किंवा तेथील झाडा झुडपांचा आधार घेऊन लपवून ठेवली जात आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत कल्याण तहलीसदारांनी वाळू माफियांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. २५ हून अधिक वाळू माफियांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशीच कारवाई या वाळू माफियांवर करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. अनेक पर्यावरणप्रेमी खाडीत सुरू असलेला वाळू उपसा पाहत आहेत, पण माफियांकडून दहशतीचा वापर होत असल्याने त्यांना विरोध करण्यास कोणी पुढाकार घेत नसल्याचे समजते.

संबंधित भागात तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना पाठवून तेथील प्रत्यक्ष ठिकाणची माहिती घेण्यात येईल. तेथील परिस्थितीप्रमाणे पोलीस बंदोबस्त घेऊन रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

– दीपक आकडे, तहसीलदार