दोन दिवसांत पाणीसाठय़ात चार टक्क्यांची भर

ठाणे : जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून दाखल झालेल्या मोसमी पावसाने अखेर ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात बरसण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून त्यामुळे बारवी, भातसा, आंध्रा धरणांतील पाणीसाठा चार टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.

जून महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ओढ घेतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना गेल्या काही दिवसांपासून झोडपण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी एकूण पावसापैकी निम्म्याहून अधिक पाउस शहरी भागात कोसळत असल्याने गेल्या आठवडय़ापर्यत धरण क्षेत्रात पुरेशा पर्जन्य सरी कोसळल्या नव्हत्या असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे होते. दरम्यान सोमवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाची कृपा बारवी, भातसा आणि आंध्रा धरण क्षेत्रातही झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या ४८ तासांत मुरबाड येथील बारवी धरणक्षेत्र प्रकल्पात ९७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहापूर येथील भातसा धरण प्रकल्प क्षेत्रात २६६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्य़ातील आंध्रा धरणक्षेत्रात १४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे ३ जुलै रोजी बारवी धरणक्षेत्रात ५२.२७० दलघमी, भातसा धरणक्षेत्रात २६२.३२ दलघमी तर आंध्रा धरण प्रकल्पक्षेत्रात ८४.६१ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्था आंध्रा आणि बारवी धरणांतून पाण्याचा उपसा करतात. या प्राधिकरणांमुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या भागांना पाणीपुरवठा होतो. ठाणे जिल्ह्य़ास पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांना ४० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा होतो. तर भातसा धरणावरील नदी पात्रातून ठाणे महापालिका स्वतच्या योजनेसाठी पाणी उचलते. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या पाणीपुरवठय़ासाठी महत्त्वाच्या बारवी, आंध्रा आणि भातसा या मुख्य धरण प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात वाढ होत असून पुढील काही काळ असाच पाऊस राहिला तर महापालिका क्षेत्रात लागू असणारी पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठा टक्केवारी

धरण   २७ जून १ जुलै ३ जुलै

बारवी   १३.८७ १८.५९  २२.४३

भातसा  २२.१२  २५.०५  २७.८५

आंध्रा   २०.४०  २२.५६  २४.९५