इंजेक्शनच्या शोधात नातेवाईकांची वणवण; स्वतंत्र यंत्रणा उभारूनही परिस्थिती गंभीर

ठाणे : जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली असतानाही खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना आजही इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत  आहे. यामुळे रेमडेसिविरच्या शोधात नातेवाईकांची वणवण सुरूच आहे. जिल्हा आणि पालिका यंत्रणांमार्फतच रेमडेसिविरचा पुरवठा केला जात असून यामुळे इतरत्र इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हतबल झाल्याचे चित्र आहे.

पालिकांना उपलब्ध होणारे इंजेक्शन पालिका करोना रुग्णालयांमध्ये वापरण्यात येते. तर, जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होणारे इंजेक्शन खासगी रुग्णालयांना देण्यात येतात. खासगी रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून त्यामार्फत जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. या यंत्रणेने गुरुवारी जिल्ह्यातील २११ खासगी रुग्णालयांना २९०० रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आठशेच्या आसपास आणखी इंजेक्शनचा पुरवठा केला आहे. असे असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून त्या तुलनेत हा साठा पुरेसा नसल्याचे समोर येत आहे.

या संदर्भात एका रुग्णाचे नातेवाईक अस्मा शेख यांनी सांगितले, ‘सद्यस्थितीत जिल्हा आणि पालिका यंत्रणांमार्फतच रेमडेसिविरचा पुरवठा केला जात असून यामुळे इतरत्र इंजेक्शन विक्रीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयांना मिळतात. पण, ते रुग्ण संख्येस पुरेसे नसल्याचे सांगत डॉक्टर ते बाहेरून आणण्यास सांगतात. पण, ते कुठेच मिळत नाही, असेही काही नातेवाईकांनी सांगितले.

रेमडेसिविर इंजेक्शनचा जितका साठा उपलब्ध होतो, तितका साठा खासगी रुग्णालयांना लगेचच वाटप करण्यात येतो. मागणीनुसार आम्ही त्यांना साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्ना करीत आहोत. – राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी