प्रशासनाकडून रखडलेले पूल, रस्तेकामांना सुरुवात

कल्याण : टाळेबंदीमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-शिळफाटा रस्त्यावर रखडलेली पत्रीपूल आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू केली आहेत. २० दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्ण ठप्प असल्याने या संधीचा लाभ उठवत महामंडळाने रस्ता रुंदीकरण व रेल्वेने रखडलेल्या पत्रीपुलाच्या जोडकामाचे काम सुरू केले आहे.

पावसाळा तोंडावर आल्याने कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्ता रुंदीकरणाचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. मागील वर्षभरापासून शिळफाटा दत्त मंदिर चौकापासून कल्याण दिशेने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील वाहनांची सततची वर्दळ, दावडी, गोळवली येथील रस्त्यावरील बाजार आणि पादचारी यामुळे महामंडळाला काम करण्यात अडथळे येत होते. गेल्या वीस दिवसांपासून शिळफाटा रस्त्यावर टाळेबंदीमुळे शुकशुकाट असल्याने महामंडळाने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. मागील दीड वर्षांपूर्वी धोकादायक झाल्याने तोडण्यात आलेला पत्रीपूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. पूल तोडल्यानंतर तो तीन महिन्यांत उभारण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणींमुळे पूल वेळेत उभारता आला नाही. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम रेल्वे करीत आहे. टाळेबंदीमुळे रेल्वे वाहतूक बंद आहे. या संधीचा लाभ उठवत रेल्वेने पत्रीपुलाच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. रेल्वे कर्मचारी करोना साथीचा संसर्ग होणार नाही, अशी खबरदारी घेत ही कामे करीत आहेत. रस्ता रुंदीकरणातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.