डोंबिवली पूर्व भागातील राधाबाई साठे विद्यालयात गरजू, कष्टकरी पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये. त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून इनरव्हिल क्लब डोंबिवली पूर्व विभागाने या शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इनरव्हिल क्लबच्या साक्षरता अभियनातून विद्यार्थी हिताचे कार्यक्रम शाळेत राबविण्यात येणार आहेत. या अभियानाचा भाग म्हणून शाळेतील ९६ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क क्लबने शाळेत भरणा केले आहे. काही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून इयत्ता पहिली ते दहावीच्या ४०५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा राजश्री चावरे यांनी दिली. मानसी वैद्य, विद्या बैतुले, नयना सुंठणकर, विजया नांद्रे, संगीता गोडसे यांच्या पुढाकारातून हे साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे. याशिवाय क्लबतर्फे मतिमंद मुलांच्या शाळेत काही सुविधा देण्यात आल्या. शहराच्या विविध भागांत वृक्षारोपण कार्यक्रम करून झाडांचे संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शाळांमधील गुणवंत शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. वर्षभर हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत, असे चावरे यांनी सांगितले.