महावितरणच्या पश्चिमेतील ‘अ’ विभागात वीज बिलाची वसुली अधिक असूनही विभागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने विकतची काहिली सोसावी लागत आहे. अनियमित वीजपुरवठय़ामुळे सर्वत्र संताप आहे. ‘महावितरण’ने या भागात भारनियमन सुरू केल्याची कोणतीही माहिती दिली नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी नागरिकांच्या वतीने या समस्येविषयी कार्यकारी अभियंता संजीव चौधरी यांना निवेदन दिले आहे. डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वीज ग्राहकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. डोंबिवलीची वीज वसुली शंभर टक्के असूनही वीजपुरवठा सतत खंडित होतो. पावसाळा तोंडावर आला असताना नादुरुस्त वीज वाहिन्या दुरुस्त केल्या नाही तर नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे भोईर यांनी सांगितले. याविषयी महावितरणचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चौधरी म्हणाले, डोंबिवलीत सध्या काही भागात सतत वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम डोंबिवलीत वीजपुरवठा करणारे एकच उपकेंद्र असून त्या ठिकाणी आणखी एका उपकेंद्राची गरज आहे. एका उपकें द्रावर ताण येत असून दुसऱ्या उपकेंद्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेकडे यासाठी जागा मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.