सकारात्मक बदलासाठी पेलाव्या लागणाऱ्या आव्हानांना सामोरे जात एखादी स्त्री आपला विशिष्ट ठसा समाजात उमटवते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत संवेदनशील मन जागृत ठेवून निष्ठेने कर्तव्य बजावणारी ‘ती’ याच कारणामुळे सर्व महिलांमध्ये विशेष ठरते. बदलासाठी केवळ आंदोलन, मोर्चात सहभागी न होता पडद्याआड राहून समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने ‘ती’ अविरत झटते.. असे करताना तिला कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा नसते. परिस्थितीतील बदलाबाबत केवळ चर्चा न करता स्वत: पुढाकार घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ठाणे परिसरातील या सात महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त लोकसत्तातर्फे सलाम..  

डोंबिवली प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार..

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
ajit pawar
चावडी: अजितदादा आणि ईडी !
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

1केवळ चर्चा करून पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही. त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. याच विचाराने प्रेरित होऊन डोंबिवलीतील स्नेहल दीक्षित यांनी समविचारी महिलांना एकत्र करून सुरू केलेल्या प्लास्टिक मुक्ती अभियानाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांच्या ऊर्जा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शहरात त्यांनी ही चळवळ सुरू केली. आतापर्यंत त्यांनी जवळपास तीन टन प्लास्टिक गोळा करून पुण्यातील इंधननिर्मिती प्रकल्पाला दिला आहे.

लग्न झाले तेव्हा केवळ पदवीधर असलेल्या स्नेहल दीक्षित यांनी विपणन व्यवस्थापन विषयातले पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी महिलांना गुंतवणूकविषयक मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. एका खासगी कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या भावनेतून त्यांनी दोन वर्षांपूर्वी ऊर्जा फाऊंडेशनची स्थापना केली. शहरातील जवळपास ४० ते ४५ महिलांच्या सहकार्याने त्या प्लास्टिकमुक्ती अभियान राबवीत आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर शासनाने २००६ मध्ये बंदी घातली आहे. मात्र आजही बाजारात सर्रास या पिशव्या वापरात असल्याचे दिसून येते. प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, असे नागरिकांना केवळ सांगून उपयोग नाही. जनजागृतीपर कार्यक्रम तर सारेच घेतात. मात्र प्रत्यक्षात कृती कुणी करीत नाही. भाजी विक्रेत्यांकडे या पिशव्या जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने त्यांच्यापासून या कार्याची सुरुवात फाऊंडेशनने केली. सुरुवातीला त्यांना या पिशव्या न वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर या विक्रेत्यांकडे येणाऱ्या ग्राहकांना हे विक्रेते समजावून सांगू लागले. प्लास्टिकच्या पिशव्यांसोबतच रोजच्या वापरात अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा आपण वापर करतो. हे प्लास्टिक अनेकदा कचऱ्यात टाकून दिले जाते. त्याचा पुनर्वापर केला जात नाही. पुण्यातील डॉ. मेघा ताडपत्रीकर प्लास्टिकचे रिसायकलिंग करून त्यापासून इंधननिर्मिती करतात. ऊर्जा फाऊंडेशनने त्यांची मदत घेतली. घरोघरी जाऊन शहरातील प्लास्टिक गोळा केले जाऊ लागले. दुधाच्या पिशव्या, भाजीवाल्याकडून येणाऱ्या कॅरी बॅग, चहाचे प्लास्टिकचे कप, अन्नपदार्थाची पाकिटे, श्ॉम्पू पाकिटे, खेळणी, बाटल्या, औषधांची रिकामी पाकिटे, गोळ्या- बिस्किटांची आवरणे, प्लास्टिकचे अन्नपदार्थाचे डबे यांसारख्या एरवी कचऱ्यात जाणाऱ्या वस्तू संकलित होऊ लागल्या. शहरातील विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य संस्थेला लाभले.

महत्त्वाकांक्षी धाव

2पोलीस म्हटले की नागरिकांच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्यावर असलेली व्यक्ती अशीच प्रतिमा जनसामान्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. मात्र कर्तव्य बजावीत असतानाच आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देत खेळात प्रावीण्य मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे कामही हे पोलीस सध्या करत आहेत. कल्याणमधील शोभा देसाई त्यापैकीच एक. पोलीस या नात्याने कर्तव्य बजावीत असतानाच उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांनी आत्तापर्यंत उत्तम कामगिरी करत ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे. येत्या जून महिन्यात चीन येथे होणाऱ्या मास्टर्स स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार असून जगभरात देशाचे नाव करण्याची जिद्द त्यांनी उराशी बाळगली आहे.

कल्याण येथील शोभा देसाई या पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर १९९५ पासून कार्यरत आहेत. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या पोलीस संरक्षण पथकात त्या कार्यरत आहेत. शोभा यांना खेळाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. कऱ्हाड येथील उगलेवाडी हे त्यांचे गाव असून येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी तेथील देसाई-चव्हाण महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असतानाच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, ओपन नॅशनल अशा विविध खेळांत सहभागी होत अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांचे खेळातील प्रावीण्य बघून अशोक कामटे यांनी त्यांना पोलीस दलामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. मात्र पोलीस दलात कर्तव्य बजाविताना आपल्यातील खेळाडू कुठे तरी मागे पडेल, याची भीती शोभा यांना वाटली. मात्र कामटे यांनी त्यांना पोलीस दलात कार्यरत असतानाही खेळात प्रावीण्य मिळविता येईल, असे सांगितल्यावर त्यांनी पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला. पोलीस भरतीच्या वेळी पुरुषांच्या गटातून ८०० मीटर धावताना त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. पोलीस दलात कार्यरत असतानाही त्यांचा रोजचा सराव सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात हैदराबाद येथे पार पडलेल्या ३८ व्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

जून महिन्यात चीन येथे होणाऱ्या एशियन मास्टर स्पर्धेत त्यांची निवड झाली असून त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासोबतच २०१६ मध्ये मे महिन्यात सिंगापूर येथे पार पडलेल्या आशियाई मास्टर्स स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत दोन किलोमीटर अंतरात चौथा, तर पाच किलोमीटर अंतरात त्यांनी सातवा क्रमांक पटकावला आहे.

 

कोणताही पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करून स्पर्धेत बाजी मारण्याचा माझा प्रयत्न असतो. पोलीस दलातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सूट दिली जाते. त्यामुळे वेळेचे नियोजन करून सराव आणि पोलीस दलातील कर्तव्य बजावणे अवघड जात नाही. इतर खेळाडूंना त्यांची शारीरिक तंदुरुस्ती कायम राखणे व सराव करण्यासाठी आर्थिक मदतीची तसेच सराव करण्यासाठी योग्य मैदानांची आवश्यकता आहे.

हिरवी राणी!

3ठाणे खाडीकिनारी होणारा अवैध रेती उपसा, नैसर्गिक साधनसंपत्तीवर दिवसेंदिवस वाढत जाणारे अतिक्रमण यामुळे अस्वस्थ झालेली ‘ती’ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने न्यायालयाची दारे ठोठावते. खाडीकिनारी परिसरात असणाऱ्या विविध पक्ष्यांविषयी अभ्यासपूर्ण संशोधन करते आणि खाडीच्या समृद्ध अशा जैवविविधतेची ओळख पर्यावरणप्रेमींना करून देते. ठाणे खाडीकिनारी होणारा मानवी हस्तक्षेप अद्याप थांबला नसला तरी खाडी सफर, पक्षी निरीक्षण सहल, संशोधन, खाडी पर्यावरणविषयक जनजागृती या माध्यमांतून खाडीचे रक्षण करण्यासाठी तिचा लढा सातत्याने सुरूआहे. निसर्गाविषयी नितांत आत्मीयता असलेली आणि ठाणे खाडीला शासनाने ‘रामसर’ घोषित करण्याची वाट पाहणारी ही ठाणेकर महिला आहे क्लारा कोरिया.. पाणथळ जमिनींच्या संवर्धनाविषयी त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. त्यांच्या निरीक्षणाची दखल घेत न्यायालयाने शासनाला संवर्धनाचे आदेश दिले.

क्लाराने लहानपणीच शिक्षिका व्हायचे स्वप्न पाहिले आणि ते जिद्दीने पूर्ण केले. विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या क्लाराने शिक्षिका पेशा केवळ स्वार्थासाठी सांभाळला नाही. शिक्षिका म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना तिने स्वत:तील संवेदनशील वृत्ती कायम जागृत ठेवली. काही कारणास्तव शिक्षण अर्धवट राहिलेली रस्त्यावरील मुले, विद्यार्थ्यांचे पालक, रिक्षाचालक अशा लोकांसाठी शाळेचे वर्ग संपल्यावर क्लारा शिकवायची. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना वडिलांचे नाव माहिती नसल्याने शाळेत प्रवेश मिळत नव्हता. या वेळी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी आईचे नाव ग्राह्य़ धरावे या मागणीसाठी शिक्षण विभागाकडे क्लारा यांनी पाठपुरावा केला. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, आरोग्यविषयक शिबिरे भरविणे या माध्यमातून क्लाराने सामाजिक बांधिलकी जपली. २०११ पासून क्लाराने पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पाच्या निमित्ताने सुरूझालेला पक्षी निरीक्षण आणि ठाणे खाडीचा प्रवास अद्याप कायम आहे. ठाणे खाडीकिनारी पक्षी निरीक्षण करताना क्लाराने जैवविविधतेवर झालेले अतिक्रमण पाहिले. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. ती परिस्थिती बदलण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. पर्यावरण दक्षता मंडळ आणि होप या पर्यावरणविषयक संस्थांच्या माध्यमातून खाडीकिनारी होणाऱ्या अतिक्रमणाविषयी आवाज उठवण्यासाठी क्लाराने प्रयत्न केले. क्लाराने तिची ही निरीक्षणे ‘द स्टडी ऑफ अ‍ॅविफॉना मीठबंदर एरिया- ठाणे क्रीक (इस्ट)’ या शोधनिबंधामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली. पाणथळ जमिनी आणि त्यांचे संवर्धन हा तिच्या अभ्यासाचा विषय आहे.   ठाणे खाडीकिनारी आढळणाऱ्या दुर्मीळ पक्ष्यांच्या जाती, २०११ ते २०१५ या कालावधीत खाडीकिनारी दाखल झालेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जातींचे संशोधनात्मक सांख्यिकीविश्लेषण क्लाराने तिच्या शोधनिबंधात केले. खाडीकिनारी होणारा पाणीउपसा, डम्पिंग, कांदळवनावर होणारे अतिक्रमण या विरोधात सहकाऱ्यांच्या साथीने न्यायालयात क्लारा कोरिया लढली आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. सध्या ‘नॅशनल एन्व्हायरन्मेंट वॉच’ या संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहे. असणारी क्लारा पाणथळ जमिनी आणि कांदळवने संवर्धनाविषयी संशोधनात्मक परिषदा आयोजित करते.

लहान मुलांमध्ये पर्यावरणाविषयक आपुलकी निर्माण व्हावी यासाठी खाडीकिनारी सफर, पक्षी निरीक्षण या माध्यमांतून ठाणे खाडीकिनारची जनजागृती करण्यासाठी क्लारा प्रयत्नशील आहे. हे काम करताना अनेक व्यावसायिकांचा रोष क्लारा यांनी पत्करला असला तरी सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी असलेली उदासीनता सर्वात मोठे आव्हान असल्याचे क्लारा सांगते.

आरोग्याबरोबरच गावाचा प्रपंच सुधारण्याचे आव्हान!

4‘बाई झाली सरपंच अन् वाया गेला प्रपंच’ असे पूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये म्हटले जायचे. आता काळ बदलला. आरक्षणामुळे पुरुषांच्या बरोबरीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना स्थान मिळाले. त्यामुळे बाई सरपंच झाल्यामुळे उलट गावाचा प्रपंच सुधारल्याची उदाहरणे आहेत. भिवंडी आणि कल्याण या दोन महानगरांमधील कोन या ग्रामपंचायतीचे सरपंच असणाऱ्या डॉ. रुपाली कराळे यांनीही गावाचा प्रपंच सुधारण्याचा निर्धार केला आहे.

डॉ. रुपाली मूळच्या नाशिकच्या. चांदवड येथून त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. २००९ मध्ये डॉ. अमोल कराळे यांच्याशी लग्न होऊन त्या कोनगावात आल्या. गावात डॉ. अमोल यांचे रुग्णालय आहे. तिथेच त्याही रुग्णसेवा करू लागल्या. रुपाली यांचे सासरे बाळाराम कराळे हे राजकारणात आहेत. त्यामुळे २०१२ मध्ये संधी मिळून त्या ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. या वर्षी जानेवारी महिन्यात सरपंचपदी त्यांची बिनविरोध नियुक्ती झाली. रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई आणि अवैध रेती उपसा आदी कोन गावाच्या प्रमुख समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.  गावामध्ये सध्या पाण्याची भीषण समस्या भेडसावते. ती समस्या सोडविण्यासाठी गावात नव्या जलवाहिन्या टाकणे, पाण्याची टाकी उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. रुपाली यांनी दिली. अवैधरीत्या चालणाऱ्या रेती उपशाला वेसण घालण्यासाठी आम्ही गावकरी एकवटलो असून त्यासाठी आमचा लढा सुरूआहे. ग्रामीण भागात आगरी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजातील लग्नात हळदी समारंभात अवाढव्य खर्च केला जातो. याविषयी गावात आम्ही जनजागृती सुरू केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. अनेक जण साधेपणाने सोहळे साजरे करू लागले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अहोरात्र कार्यरत..

6काही क्षेत्रांतील पुरुषप्रधानता अजूनही कायम आहे. महसूल खात्यातील निवासी उपजिल्हाधिकारी पद त्यापैकी एक. एखाद्या लष्करी अधिकाऱ्यासारखे अहोरात्र कार्यरत राहावे लागत असल्याने या पदावर कायम पुरुष अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. ठाणे जिल्ह्य़ाच्या निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी या राज्यातील एकमेव महिला अधिकारी आहेत.

धुळे जिल्ह्य़ातील वंदना सूर्यवंशी यांचे शिक्षण औरंगाबाद येथे झाले. तिथून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबातील सर्वच महिला या प्रशासकीय क्षेत्रात मोठय़ा पदांवर आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात एका मोठय़ा कंपनीसोबत काम करूनही समाधान न मिळाल्याने, त्यांनी १९९८ मध्ये नियोजनबद्ध अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. जागतिक बँकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले. त्यामध्ये त्या वेळी मुंबईतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे काम सुरू होते. अतिक्रमणांवर कारवाई करताना निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी अत्यंत काळजीपूर्वकरीत्या हाताळला. अनेक जुनी घरे, समाजमंदिर आणि धार्मिक स्थळांवर कारवाई करतानाही सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. या प्रकल्पामुळे मुंबईतील अनेक झोपडपट्टी भाग रिकामा झाला. मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाच्या झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या गणपत पाटील नगर या भागात त्यांनी काम केले. संपूर्ण भाग अनधिकृत असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकही नवी शिधापत्रिका दिली नाही. त्यामुळे नव्या झोपडय़ांना र्निबध घातला गेला. मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्या यंत्रणेने या कामासाठी विशेष पाठिंबा दिल्याने हे काम यशस्वीपणे पूर्ण करणे त्यांना शक्य झाले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. त्यानंतर काही काळ मुंबईत मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.

गेल्या एक वर्षांहून अधिक काळ त्या ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या पदावर पुरुषांची मक्तेदारी असल्याने त्यांच्यावर उत्तम काम करण्याची जबाबदारी होती. या काळात धडाडीच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्यासोबत त्यांनी काम पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्येक कारवाईची अंमलबजावणी करणे हे त्यांचे काम त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. विविध विभागांशी संपर्क साधून काम फत्ते करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते, त्या ते उत्तमरीत्या करतात.

शास्त्रीय नृत्याची लोककलांशी सांगड

5ठाण्यातील सुप्रसिद्ध नर्तिका मुक्ता जोशी यांनी पारंपरिक कथ्थक नृत्यकलेला इतर भारतीय लोककलांशी जोडत जगभरातील रसिकांची दाद मिळवली आहे. विशेषत: राजस्थान आणि काश्मीरमधील लोकनृत्यांशी कथ्थकची त्यांनी घातलेली सांगड अद्वितीय अशीच आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यात ठाणेगौरव, सरदारी बेगम आदी भारतीय पुरस्कारांबरोबरच कोरिया शासनाच्या वतीने दिल्या गेलेल्या ‘द फर्स्ट लेडी’ या सन्मानाचाही समावेश आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ नृत्यधारा संस्थेच्या माध्यमातून त्या नव्या पिढीला नृत्यकलेचे धडे देत आहेत. त्याचप्रमाणे नृत्यकलेच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देणारा कार्यक्रम सादर करतात.जयपूर घराण्यातील सुप्रसिद्ध नर्तिका रोशन कुमारी यांच्याकडे मुक्ता जोशी यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. कथ्थक नृत्यातील अभिजाततेला कुठेही धक्का न लावता इतर लोककलांसोबत त्यांनी केलेले फ्यूजन विशेष लक्षवेधी ठरले आहे. गेल्या वर्षी त्यांनी ठाण्यात ‘राणी की बाव’ ही पारंपरिक नृत्यनाटिका कथ्थकशैलीत सादर केली. शास्त्रीय नृत्यकलेबरोबरच लोककलांचाही आदर करायला हवा, असा त्यांचा आग्रह असतो. नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती एक साधना आहे. कलेच्या साधनेतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. त्याने मनाला शांती मिळते, असे त्यांचे मत आहे. मुक्ता जोशी यांनी जयपूर घराण्याची ही कला परदेशात नेली. तिथेही  नृत्यकला लोकप्रिय केली.

 

7दुर्गम भागातील सामाजिक अभिसरण 
स्नेहल नाईकने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजकार्याला वाहून घेतले आहे. पालघर येथे राहणाऱ्या स्नेहलने दुर्गम भागातील परिस्थिती डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्या आदिवासी जनतेसाठी काही तरी करावे यासाठी ती झटत आहे. तिने ‘नीड’ नावाची संस्था स्थापन केली. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूटमधून समाजसेवेचे प्रशिक्षण घेतले. कर्वे इन्स्टिटय़ूटच्या अंतर्गतच ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर येथे तिने काम सुरू केले. ‘रूपांतर’ नावाची एक संस्थाही तिने स्थापन केली. शहापूर तालुक्यातील दुर्गम दापूरमाळ गावातील शाळेत तिने ‘ई लर्निग’चे धडे देण्यास सुरुवात केली. या शाळेत लहान मुलांसोबत गावातील प्रौढांनीही शिक्षण घेतले. वीज नसलेल्या या वस्तीत सौर ऊर्जेद्वारे त्यांनी प्रकाश आणला. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ऊर्जा फाऊंडेशनचे सहकार्य घेतले. या माध्यमातून स्थानिक महिलांनी शिवलेल्या गोधडय़ांना शहरी बाजारपेठ मिळवून दिली. परिसरातील १५ गावांना शिक्षण सुविधा मिळवून दिल्या.

लेखन : शर्मिला वाळुंज, भाग्यश्री प्रधान, शलाका सरफरे, किन्नरी जाधव