शाळेच्या उपाहारगृहांमध्ये पिझ्झा, चायनीज, चीज सॅण्डविजचा मेन्यू; अर्थाजनापायी मुलांच्या आरोग्याशी खेळ?

शाळेच्या मधल्या सुट्टीत लागणाऱ्या भुकेसाठी घरची पोळीभाजी हा आदर्श आहाराचा मार्ग बाजूला सारत ठाण्यातील काही शाळांनी त्यांच्या उपाहारगृहात विद्यार्थ्यांना चक्क जंक फूड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. बर्गर, नूडल्स, पिझ्झा, चायनीज, चीज सॅण्डविज हा ठाण्यातील काही ‘बडय़ा’ शाळांच्या उपाहारगृहाचा मेन्यू आहे. हा मेन्यू विद्यार्थ्यांना पसंत पडत असला तरी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सरकारने शाळा परिसरात आरोग्यास हानिकारक असे पदार्थ विकण्यास सक्त मनाई केली आहे. त्या निर्णयाला अनुसरून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) त्यांच्या शाळांपासून २०० मीटरच्या परिघात जंक फूड मिळणार नाही, याची खबरदारी घेतली होती. मात्र सीबीएससीच्याच काही शाळांमध्ये अशा प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच इतर खासगी शाळांमध्येही सर्रास वेफर, बर्गर, नूडल्स, पिझ्झा आदी खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात. या सर्वाचे मूळ अर्थकारणात दडल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. कंत्राटी पद्धतीने शाळेचे उपाहारगृह चालविण्यासाठी दिले जाते. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण नसल्याने हे कंत्राटदार आपल्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याचे दिसून येते. उपाहारगृहांमध्ये मिळणाऱ्या पदार्थामध्ये कॅलरीज्, मीठ आणि साखर यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अन्य विकार बळावण्याची भीती असते. आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते जंक फूडस्मध्ये कोणतीही पोषणमूल्ये नसतात. उलट सातत्याने असे पदार्थ खाण्याने आजाराला निमंत्रण देणारे ठरते.

काही शाळांमध्ये यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी असे पदार्थ उपाहारगृहामध्ये बनविले जात असले तरी त्यात बंदी घालण्यात आलेल्या अजिनोमोटोसारख्या पदार्थाचा वापर केला जात नसल्याचे सांगण्यात आले.

लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी जशी पालकांची असते तशी शाळेचीही असते. हल्ली शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जंक फूडची विक्री केली जाते. मागणी तसा पुरवठा हे सूत्र आता शाळाही मान्य करूलागल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये ९ ते १० वर्षांपासूनच ओबॅसिटीचे(स्थूलपणा) लक्षण दिसून येते. शाळेच्या व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

-डॉ. संदीप केळकर, बालरोगतज्ज्ञ

शाळेमध्ये कोणते पदार्थ विक्री करावेत किंवा करु नयेत हा सर्वस्वी शाळेच्या व्यवस्थापनाचा निर्णय असतो. त्यावर अन्न व औषध प्रसासनाचे कोणतेही नियंत्रण नसते. मात्र तेथील अन्नाची गुणवत्ता तपासणे हे या विभागाचे काम आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थाची गुणवत्ता योग्य नसल्यास उपहारगृह व्यवस्थापनावर कारावाई करण्यात येईल.

सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन