स्मार्ट सिटी प्रकल्पातून ३० हजार दिवे बसविण्यास सुरुवात

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर मंद प्रकाशाचे आणि कमी विजेच्या वापरावर चालणारे ३० हजार पथदिवे बसविण्याच्या कामास स्मार्ट सिटी कल्याण-डोंबिवली कंपनीने सुरुवात केली आहे. या सौम्य प्रकाशाच्या पथदिव्यांमुळे पालिकेचे महावितरणाला भरण्यात येणारे वीज देयक ५० टक्क्यांनी कमी होण्यास साहाय्य होणार आहे. एलईडी पथदिव्यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ३७५ किलोमीटर लांबीचे रस्ते उजळून निघणार आहेत.

कामाचा ठेका दिल्यापासून ठेकेदाराने सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता येत्या सात ते आठ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास स्मार्ट सिटी कंपनीतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

पालिका हद्दीत ३७५ किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. टिटवाळा, मोहने, आंबिवली, कल्याण पूर्वेतील नेवाळी, चिंचपाडा, पश्चिमेतील गंधारे, बारावे, उंबर्डे, डोंबिवलीत मानपाडा रस्ता, कोपर, पश्चिमेत राजूनगर, गणेशनगर अशा परिसरांत एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. पूर्वीपासून पालिकेच्या रस्त्यांवर सोडियम व्हेपरचे दिवे आहेत. या दिव्यांचा प्रकाश प्रखर झोताचा आणि या दिव्यांना महावितरणकडून होणारा वीजपुरवठा अधिक क्षमतेचा लागत असल्याने महापालिकेला दर महिन्याला लाखो रुपयांचे वीज देयक पथदिव्यांमुळे येत होते. त्यामुळे पालिकेने वाढते वीज देयक कमी करण्यासाठी एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली कार्पोरेशन कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले आहे.  दुर्गाडी पूल ते पत्रीपूल एलईडी दिवे बसविण्याचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

शहरातील रस्त्यांवर स्मार्ट सिटी प्रकल्पातून ३० हजार पथदिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे ठेकेदारावर बंधन आहे. या दिव्यांची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदाराने करायची आहे. – तरुण जुनेजा, प्रकल्प अभियंता, स्मार्ट सिटी