कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे रहिवासी वाढीव नळ जोडणी घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. काही रहिवासी खासगी प्लम्बरशी संपर्क साधून महापालिकेच्या जलवाहिनीवरून चोरून नळजोडणी घेऊन मोकळे होत आहेत. ही जलवाहिनी घेताना महापालिकेच्या परवानग्या न घेता मुख्य रहदारीचे रस्ते खोदून वाहिन्या टाकण्यात येत आहेत. खोदलेले रस्ते सुस्थितीत करण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

नळ जोडणी टाकून झाली की त्यावर माती व दगड टाकले जातात. रस्ता डांबरी असल्याने पुरलेल्या नळ जोडणीवर टाकलेली माती सततच्या वाहन व वर्दळीने डांबरी रस्त्यावर पसरते. या मातीवर दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व, पश्चिम आणि टिटवाळा भागात रस्ते खोदून नळ घेण्याचे उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या प्लम्बरना पडद्यामागून पालिकेच्या प्लम्बरचा पाठिंबा असल्याने खासगी प्लम्बर धाडसाने रस्ते खोदून नळजोडणी टाकण्याची कामे करीत आहेत.

गेल्या चार ते पाच महिन्यांत डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर सात ते आठ ठिकाणी रस्ते फोडून जलवाहिनी घेण्याचे प्रकार घडले आहेत. पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाच्या कोपऱ्यावर दोन ते तीन ठिकाणी रस्ते खोदून त्यावर माती टाकण्यात आली आहे. भोईरवाडीतील दूरध्वनी कार्यालयाजवळ जलवाहिनीसाठी रस्ता खोदून त्यावर मातीचा ढीग लावून ठेवण्यात आला आहे. सुभाष रस्ताही खोदण्यात आला आहे. अशीच परिस्थितीत पंडित दिनदयाळ रस्त्यावर आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी नळजोडणीसाठी रस्ते खोदून त्यावर दगड, माती टाकून कामे अर्धवट टाकून देण्यात आली आहेत.  पालिका कार्यालये संध्याकाळी साडेपाच वाजता बंद होताच सहा ते रात्री उशिरापर्यंत चोरून नळजोडण्या घेण्याची कामे केली जात आहेत. नगरसेवकही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नळ जोडणीसाठी टाकण्यासाठी खड्डे मारण्यात येतात. त्या खड्डय़ांचे ठरलेले दर पालिका वसूल करते. मगच अशा खड्डय़ांना परवानगी देते. पण रस्त्यावर नियमबाह्य़ खड्डे खोदून कोणी नळ जोडणी घेत असेल. त्याबाबत कोणी तक्रार केली तर संबंधितावर कारवाई रण्यात येईल व ती बेकायदा नळ जोडणी खंडित करण्यात येईल.

-तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, कडोंमपा