18 January 2019

News Flash

बायपास बंद तरीही मुंब्य्रात कोंडी

मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे.

मुंब्रा बावळण मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी आठवडाभरापासून बंद करण्यात आला आहे. मात्र कल्याण, नवी मुंबई, पनवेल या दिशेने जाणारी वाहने मुंब्रा शहरातून मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.    (छायाचित्र — दीपक जोशी)

कल्याण, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची शहरातून वाहतूक

ठाणे : दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने शीळफाटा ते मुंब्रा-कौसा हा मार्ग वाहतुकीसाठी सुटसुटीत होईल, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्य प्रवासी व वाहनचालकांना गेल्या काही दिवसांपासून वेगळाच अनुभव येत आहे. बाह्यवळण रस्ता बंद करण्यात आल्याने लहान टेम्पो, बस तसेच अन्य वाहने मुंब्रा शहरातून ठाणे, कळव्याच्या दिशेने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे मुंब्रा, खारेगाव, कळवा या भागांत मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता मुंब्रा शहरातून लहान वाहनांना प्रवेश सुरू ठेवण्यात आला आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने होणारी अवजड वाहतूक मुंब्र्यामार्गे होत असल्याने कल्याण-शीळ मार्गावरही मोठी कोंडी होत असे. ही कोंडी गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी मुंब््राा आणि खारेगाव नाक्यावर मात्र हलक्या वाहनांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे, असे निरीक्षण या मार्गावर नियमित प्रवास करणारे प्रवासी व्यक्त करीत आहेत. कल्याण किंवा नवी मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी, छोटी मालवाहू वाहने मुंब्रा शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करू लागल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

मुंब्रा परिसरात अनेक छोटेमोठे कारखाने असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच मुंब्रा स्थानकापासून कल्याण फाटापर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असून काही ठिकाणी रस्त्यांची कामेदेखील सुरू आहेत. त्यातच या भागातील मुख्य बाजारपेठेलगतच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यात आता बाह्यवळण मार्गे जाणारी वाहने या रस्त्यावरून जाऊ लागल्याने कोंडीत भर पडत आहे.

First Published on May 15, 2018 2:49 am

Web Title: kalyan navi mumbai faces heavy traffic congestion due to mumbra bypass shut