अडीच वर्षांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त कल्याणकरांना दिलासा
कल्याण : धोकादायक म्हणून जाहीर झाल्यानंतर मागील ३० महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील बहुचर्चित पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. राज्यातील प्रकल्प केंद्र किंवा राज्य सरकारचे असतील. तरी ते वेळेत पूर्ण होणे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा प्रकल्पांमध्ये ते कोणाचे आहेत यावरून अडथळे येता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.
कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून हजारो वाहने मुंबई ठाण्याच्या दिशेने येत असतात. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये तो पाडण्यात आला होता. मात्र, पुलाची रचना, परवानग्या अशा अनेक कारणांमुळे पुलाच्या उभारणीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पत्रीपुलाच्या शेजारी असलेल्या एका पुलावरून हलकी वाहने ठाण्याच्या दिशेने ये-जा करत होती. मात्र, तो पूलही अरुंद असल्यामुळे तसेच वाहनांचा भार वाढल्यामुळे वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे पत्रीपूल वाहतूक कोंडीचे केंद्र झाले होते. पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे समाजमाध्यमांवरही सरकारविरोधात टीकेची झोड उठविली जात होती. तर, हा पूल निवडणुकीपूर्वी पूर्ण व्हावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही होते. अखेर सोमवारी या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रीपूल प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ३४ कोटी रुपये खर्च आलेला आहे. पत्रीपुलाच्या लोखंडी सांगाडय़ाचे वजन ९०२ टन आहे. प्री फॅब्रिकेशन पद्धतीचे एकूण ३०० नट बोल्ट पुलासाठी वापरण्यात आले. जुळणीचे काम १०९ मीटर आहे. एक सेंटिमीटरप्रमाणे २५ किलोमीटर होईल इतके सांधेजुळणीचे काम करण्यात आले आहे. ग्लोबल फॅब्रिकेटर कंपनीने पूल उभारणीचे काम केले. हा पूल सुरू झाल्याने कल्याणमधील वालधुनी, सुभाष चौक, गजानन चौक, रामबाग, कल्याण रेल्वे स्थानक, कोळसेवाडी, नेतीवली, ९० फूट रस्ता या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
’ १९१४ मध्ये पत्रीपुलाची उभारणी केली होती
’ २३ फेब्रुवारी २०१८ ला रेल्वेकडून पत्रीपूल धोकादायक म्हणून जाहीर
’ ९ जुलै २०१८ रोजी पत्रीपूल वाहतुकीसाठी बंद
’ १८ नोव्हेंबर २०१८ रोजी क्रेनच्या साहाय्याने पत्रीपुलाचे ५४ मीटरचे दोन टप्पे दीड तासात बाजूला हटविण्यात यश.