10 April 2020

News Flash

‘केडीएमटी’च्या नव्या बस भंगारात

६९ बसची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी ७९ लाख रुपये खर्च येणार आहे.

नगरसेवकांचा आरोप; परिवहन उपक्रमाचा प्रस्ताव नामंजूर

कल्याण : जवाहरलाल नेहरू अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका उपक्रमाला दीड वर्षांपूर्वी ६९ नव्या कोऱ्या बस उपलब्ध झाल्या. या बस चालविण्यासाठी वाहक, चालक नसल्याने त्या परिवहनच्या आगारात उभ्या आहेत. या नवीन बसचे टायर, विजेऱ्या (बॅटऱ्या) परिवहन कर्मचाऱ्यांनी काढून त्या सर्व जुन्या बसना बसविल्या आहेत. नवीन बस जुन्या झाल्याचे वातावरण तयार करून या सर्व नवीन बस भंगारात (निर्लेखित) काढण्याची तयारी परिवहन प्रशासनाने केली, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केली.

हा सगळा प्रकार करणाऱ्या, बस भंगारात काढण्यासाठी अहवाल तयार करणाऱ्या जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी. तो अहवाल येत्या महासभेत सभागृहात ठेवण्यात यावा, अशी मागणी करीत ६९ बस भंगारात काढण्याचा परिवहन उपक्रमाचा प्रस्ताव फेटाळून लावला. मागील तीन ते चार सभांमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येत आहे. यावेळी हा प्रस्ताव चुकीचा आहे, असे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले. उपक्रमाचे हित न पाहता भंगारवाल्यांचे हित काही मंडळींनी साधले आहे. यासाठी काहींचे हात ओले करण्यात आले आहेत, असा आरोप नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सभागृहात केला.

६९ बसची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी ७९ लाख रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक नगरसेवकाने एक लाख रुपये दिले तरी सव्वा कोटी रकमेतून परिवहन बसचा हा दुरुस्ती खर्च निघणार आहे. नवीन बसचे टायर, विजेऱ्या काढून जुन्या बसना बसवून त्या चालविल्या जात आहेत. नवीन सर्व बस टायर, विजेऱ्या काढल्याने भंगार दाखविण्यात येत आहेत. यामध्ये मोठा घोळ आहे, अशी टीका अभिमन्यू गायकवाड यांनी केली.  उपक्रमाकडून शामा कंपनीच्या बस सुरू होत्या. नवीन बस आल्यानंतर त्या बंद केल्या. तो निर्णय महासभेला विचारून का घेतला नाही. शामा कंपनीची देयक परस्पर अदा करून त्याला मोकळे का करण्यात आले. या मागे कोण आहे याची माहिती द्या, अशी मागणी नगरसेवक सचिन बासरे यांनी केली. २७ नवीन बसच्या समोरच्या भागाकडील काचा फोडण्यात आल्या आहेत. दंगलसदृश परिस्थिती नसताना त्या कोणी फोडल्या. बाहेरचे लोक आगारात घुसले होते का, असे प्रश्न बासरे यांनी उपस्थित केले. जुन्या बस वेळच्या वेळी दुरुस्त केल्या जात नाहीत. त्यामुळे नवीन बसचे टायर, बॅटऱ्या काढण्यात आल्या आहेत. केवळ भंगारातील मलई खाण्यासाठी नव्या कोऱ्या बस भंगारात काढण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू आहे. शासनाकडून मिळणाऱ्या १०० कोटी रकमेतील २५ कोटी परिवहनला सुधारण्यासाठी देऊ, असे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सुचविले.

मंदार हळबे, प्रकाश भोईर यांनी या सर्व प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करा अशी मागणी केली. बस भंगारात काढण्यास अनुकूल नाही, हे लक्षात आल्यावर महापौर विनिता राणे यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करून प्रशासनाने पुढील महासभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

६९ बस निर्लेखनातून नवीन बस खरेदीचे नियोजन होते. ७० बस सध्या रस्त्यावर धावतात. ताफ्यातील एकूण ११८ बस रस्त्यावर आणण्याचे धोरण आहे. यासाठी ३९८ वाहक, चालकांची गरज आहे. चालक भरतीसाठी निविदा प्रक्रिया केली आहे. -मारुती खोडके, परिवहन व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:04 am

Web Title: kdmt bus rejects proposal for transport activities akp 94
Next Stories
1 संपाचा तिढा कायम
2 सेल्फी, टिकॉटॉकच्या नादात जीव गमावला
3 मालमत्ता हस्तांतर शुल्कात वाढ
Just Now!
X