News Flash

खादीचा कॉर्पोरेट अवतार

विचारधारा आता बदलल्या असल्या, तरी अस्सल भारतीय पेहेरावात खादी आपले भक्कम स्थान आजही टिकवून आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक मूल्ये, विचारधारा आता बदलल्या असल्या, तरी अस्सल भारतीय पेहेरावात खादी आपले भक्कम स्थान आजही टिकवून आहे. दरम्यानच्या काळात या जाडय़ाभरडय़ा वस्त्राने काळानुरूप कात टाकत अनेक आकर्षक रंगांना आपलेसे केले आहे. पूर्वी खादी खरेदी गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या आठवडा अथवा पंधरवडय़ापुरती मर्यादित असायची. कारण त्या काळात खादी कपडय़ांवर घसघशीत सूट दिली जाते. मात्र आता सवलतीच्या आमिषाने नव्हे तर व्यक्तिमत्त्व अधिक रुबाबदार दिसावे म्हणून खादी वस्त्रांना प्राधान्य दिले जात आहे. आपला परंपरागत साधेपणा सोडून खादी वस्त्रांनी नव्या जमान्याची पोशाखी संस्कृती स्वीकारली आहे. त्यामुळे आता गांधी जयंतीची वाट न पाहता वर्षभर खादी शर्ट, कुर्ते खरेदी केले जाऊ लागले आहेत. सध्या बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात, तसल्या खादी शर्टाना तरुणांमध्ये विशेष मागणी आहे. पूर्वी कलावंत, सामाजिक क्षेत्रात रुची असणारी तरुण मंडळी आपले वेगळेपण ठसविण्यासाठी खादी पेहेराव वापरत. आता कॉर्पोरेट तसेच कॉलेज संस्कृतीपर्यंत खादीचे लोण पसरले आहे.

अलीकडच्या काळात खादीचा पेहराव राजकारणी मंडळींपुरता मर्यादित राहिलेला नाही. खादी कुर्ता, जाकीट घातलेले व्यक्तिमत्त्व सहजच आपल्यापुढे येत असे. मात्र नेत्यांपर्यंत मर्यादित असलेली खादी आता सामान्यांच्या दिवाणखाण्यात दिसू लागली आहे. काळ कितीही मॉडर्न झाला असला, तरीही त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या खादीचा ट्रेंड आजच्या तरुण पिढीत फॅशन म्हणून रुजू लागला आहे. अलीकडे खादीचे कपडे नव्या ट्रेंडी लूकमध्ये ठाण्याच्या बाजारात आले आहेत. या नव्या लूकला तरुणाईची चांगलीच पसंती आहे. स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी स्वदेशी वस्त्र म्हणून नावारूपाला आलेली शुभ्र पांढरी खादी आजच्या फॅशनेबल युगात पुन्हा अनेकविध रंगांत बाजारात अवरतली आहे. आता खादी कॉटन व सिल्क अशा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीला बाजारात फक्त खादी नेहरू कुर्ता-पायजम्यामध्ये उपलब्ध होती. आता शर्ट, पँट, सलवार, सूट मटेरिअल, ओढणी, कुर्ता, पलाझ्झो आदी प्रकारातही ती उपलब्ध आहे. खादीचा झकास कुर्ता आणि जीन्स हे समीकरण कॉलेजियन्समध्ये आवडीचे बनले आहे. खादीच्या वन साइडेड बॅग्जनाही तरुण वर्गामध्ये खूप मागणी आहे. तरुणांना रेडिमेड कपडय़ांचे अधिक आकर्षण असते. खादीचे रेडिमेड कपडेसुद्धा आता बाजारात सहज उपलब्ध आहेत, अशी  अशी माहिती ठाण्यातील महाराष्ट्र खादी भंडारचे अशोक तलरेजा यांनी दिली.

खादी म्हणजे ज्येष्ठांनी वापरायचे, पुढाऱ्यांनी वापरायचे कपडे असा काहीसा समज केव्हाच मागे पडला आहे. काळाप्रमाणे खादीत खूप नवे प्रकार आलेले आहेत. त्यामुळे खादीलाही स्टायलिश लूक प्राप्त झाला आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या खादीचा वापर आता सगळ्याच ऋतूंमध्ये होऊ लागला आहे. ऑक्टोबरचा उष्मा वाढू लागला असून, यामध्ये सुसह्य़ कपडे म्हणून खादीकडे तरुणाई वळू लागली आहे.

शलाका सरफरे

’कुठे- महाराष्ट्र खादी भंडार, भानुशाली हॉस्पिटलच्या बाजूला, स्टेशन रोड, ठाणे (प.),

’गोखले रोड, स्टेशन रोड, कोरम मॉल, विविआना..

’किंमत- ६० रुपये ते ६०००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:07 am

Web Title: khadi corporate avatar
Next Stories
1 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची कास धरावी
2 स्मृतींची चाळता पाने
3 भाजपकडून दबाव आहे; पण सेना सोडणार नाही
Just Now!
X