जुन्या पोलीस ठाण्याच्या स्थलांतरानंतर गुन्हेगारीत वाढ

दिवसेंदिवस वाढत्या लोकवस्तीमुळे कल्याणमधील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत असताना पोलीस यंत्रणा मात्र नागरिकांपासून दुरावत चालली आहे. कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील पोलीस ठाण्याचे स्थलांतर करून ते शहराच्या वेशीबाहेर विठ्ठलवाडीमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे कोळशेवाडी परिसरात गुन्हेगारांना मोकळे रान मिळू लागले आहे. मंगळवारी जुन्या पोलीस ठाण्यापासून जवळच एका पादचाऱ्याची गर्दुल्ल्यांकडून हत्या झाल्याच्या घटनेने या भागातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षांत कल्याण पूर्वेचा विस्तार आणि लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याची पुरातन इमारत धोकादायक झाल्यामुळे त्याचे स्थलांतर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळ करण्यात आले. एका टोकाला पोलीस ठाणे गेल्यामुळे कल्याण पूर्वेत मोठय़ा प्रमाणावर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाली आहे. आधी फक्त रात्रीच्या चोऱ्या होत असत. मात्र आता तर दिवसाढवळ्याही घरांना लक्ष्य केले जात आहे. खून, हाणामाऱ्या, महिलांचे मंगळसूत्र खेचणे, पाकीटमारी, महिलांची छेडछाड,  दिवसाढवळ्या नागरी वस्त्यांत घुसून हातात धारदार शस्त्रे घेऊन दहशत पसरविणे, गाडय़ा चोरणे, जुगाराचे अड्डे,  गावठी दारूचे गुत्ते, शाळा परिसरात आणि नागरी वस्त्यांमधे  खुलेआम अंमली पदार्थाचे सेवन करणे, घरफोडय़ा, दुकानांचे शटर तोडून चोऱ्या आदी गुन्ह्य़ांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोळशेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे पुरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याची हद्द

चक्कीनाका, नांदिवली, चिंचपाडा, दुर्गानगर, हनुमाननगर, कैलासनगर, शनिनगर, खडेगोळवली, श्रीराम टॉकीज, विठ्ठलवाडी, आनंदवाडी, गणेशवाडी, कोळसेवाडी, देवळेकर वाडी, कर्पेवाडी, मंगलराघोनगर, तिसगाव, लोकग्राम, विजयनगर, शिवाजी कॉलनी, जगतापवाडी, लक्ष्मीबाग, काटेमानीवली, नेतीवली, जाईबाई विद्यामंदिर, आमराई, गवळीनगर, मेट्रो मॉलपर्यंत कोळसेवाडी पोलिसांची हद्द आहे.

जागा असूनही वापर नाही..

गणेशवाडी प्रभागात शक्तिधाम संकुल येथे सांस्कृतिक भवनासाठी आरक्षण आहे. तेथील जागेमध्ये खासगी विकासक महापालिकेला मजल्यांची इमारत काही अटींवर बांधून देत आहे. ही इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे. काहीजणांना या जागेचा वापर लग्नाचे सभागृह म्हणून करायचा आहे. मात्र इथे पोलीस ठाणे झाल्यास त्याचा उपयोग नागरिकांना होऊ  शकेल. इथे पोलीस ठाणे झाल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही प्रयत्न करण्याची गरज आहे. या मागणीसाठी आम्ही स्वाक्षरी मोहीमही राबवली होती. त्याला लाखो नागरिकांना पाठिंबा दिला होता. परंतु प्रशासन आणि नेत्यांच्या अडथळ्यामुळे हे ठाणे अडकून पडले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक नितीन निकम यांनी केली आहे.