News Flash

कोंडाणे गैरव्यवहारप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हे

विशेष चौकशी पथकाने शनिवारी सात जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

(संग्रहित छायाचित्र)

रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष चौकशी पथकाने शनिवारी सात जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यात संबंधित अधिकाऱ्यांसह एफ. ए. एन्टरप्रायजेस या वादग्रस्त ठेकेदार कंपनीच्या भागीदाराचा समावेश आहे.

कोकण पाटबंधारे विभागाने १९ मे २०११ रोजी रायगड जिल्ह्य़ातील कर्जत येथे उल्हास नदीवर कोंडाणे धरण बांधण्यास मान्यता दिली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यातील अटी-शर्तीकडे डोळेझाक करून तातडीने निविदा मागविल्या. त्यात एफ. ए. कन्स्ट्रक्शन आणि एफ. ए. एन्टरप्रायजेस या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्या प्रत्यक्षात एकच होत्या. शिवाय निविदेतील अटी-शर्तीची पूर्तता केलेली नसतानाही त्यातील एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले. इतकेच नव्हे तर शासनाकडून सुधारित मान्यता न घेता याच कंपनीला वाढीव २७१ कोटींचा ठेका देण्यात आला. या प्रकरणी जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बा. भा. पाटील, पाटबंधारे खात्याच्या ठाणे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता प्र. भा. सोनावणे, रायगड पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अ. पा. साळुंके, कार्यकारी अभियंता रा. चं. रिठे आणि एफ. ए. एन्टरप्रायजेसचा भागीदार निसार खत्री यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गैरव्यवहाराचा आरोप असणारे सर्व अधिकारी आता सेवानिवृत्त आहेत. त्यापैकी रा. चं. रिठे याला सेवेत असताना निलंबित करण्यात आले होते. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक विवेक जोशी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 1:22 am

Web Title: kondhane dam project scam
Next Stories
1 ठाण्यात वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या मद्यपी गाडीचालकाला लोकांचा चोप
2 कोकणचा भार ठाण्यावर
3 ‘लोकसत्ता’मुळे अनिल खिराडेंना दुहेरी वास्तुलाभ
Just Now!
X