ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेल्या कोपरी परिसरातील बांधकामांवर अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी रात्री उशिरा हातोडा चालविला. या परिसरातील रेल्वे स्थानक रस्ता, कोपरी बाजारावर कब्जा करत प्रवाशांची वाट अडविणाऱ्या अनेक बांधकामांवर तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. बेकायदा बांधकामे आणि पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांचा आगार म्हणून हा संपूर्ण परिसर ओळखला जातो. त्यामुळे पूर्वेकडील प्रवाशांचे मोठे हाल होत होते.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी विविध योजना राबविणाऱ्या ठाणे महापालिकेने पूर्व परिसरातील अतिक्रमणांकडे मात्र कानाडोळा केला होता. रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील रस्ता जागोजागी फेरीवाले आणि बेकायदा खाद्यविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडवून ठेवला आहे. याच भागात मांसाहारी पदार्थाचे स्टॉल्स रस्त्याच्या कडेला जागोजागी दिसून येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारपासून कोपरी भागातील बेकायदा बांधकामे, टपऱ्या, फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत घेण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत जवळपास २२५ बाधित बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, महापालिका जयस्वाल यांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा या परिसराची पहाणी करून कारवाईची तीव्रता वाढविण्याचे आदेश दिले. या कारवाईत कोपरी स्टेशन रोड, कोपरी मार्केट आणि कोपरी स्टेशन परिसरातील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले, परिमंडळ २ चे उपायुक्त संजय हेरवाडे, साहाय्यक आयुक्त मदन सोंडे, साहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांच्या पथकामार्फत ही कारवाई सुरू आहे.

दरम्यान, या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण करण्याचे आदेश महापालिका जयस्वाल यांनी कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता अर्जुन अहिरे यांना दिले आहेत. हा संपूर्ण परिसर कोंडीमुक्त व्हावा यासाठी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच संयुक्त पहाणी दौरा हाती घेतला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.