आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी आठवडाभराची प्रतीक्षा

बदलापूर : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण झालेले बदलापुरातील करोना चाचणी प्रयोगशाळा सोमवापर्यंत सुरू होऊ शकलेली नाही. या चाचणी केंद्रात अजूनही आवश्यक असलेल्या यंत्रणा उभारण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर येथे पहिल्या टप्प्यात ८०० चाचण्या केल्या जातील.

अंबरनाथ, बदलापूर शहरातून मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवेत जाणारा कर्मचारी वर्ग अधिक असल्याने येथे करोना संसर्गाचे प्रमाण अधिक वाढल्याचे बोलले जाते. दोन्ही शहरांमध्ये चाचण्यांची संख्या नगण्य असल्याने रुग्णसंख्येचा नेमका आकडा स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष आकडय़ांपेक्षा येथील रुग्णसंख्या अधिक असल्याची भीती सातत्याने व्यक्त होत होती. करोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दीड महिन्यापूर्वी बदलापूर नगरपालिकेत भेट दिली होती. त्यावेळी दहा दिवसांत या दोन शहरांसाठी एक तर जिल्ह्यात एकूण पाच प्रयोगशाळा उभारण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी आदेश देऊन दीड महिना उलटला तरी अजूनही जिल्हा प्रशासनामार्फत एकही प्रयोगशाळा कार्यान्वित झालेली नाही.

दरम्यान, गेल्या आठवडय़ात शुक्रवारी बदलापुरातील पश्चिमेत नव्याने उभारलेल्या प्रयोगशाळेचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. असे असले तरी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणेतील एक यंत्र अद्याप दाखल झाले नसल्याने सोमवारी उशिरापर्यंत ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाली नव्हती. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांसाठी हे चाचणी केंद्र असणार आहे. सध्याच्या घडीला अंबरनाथ शहराच्या अवघ्या २० चाचण्या मुंबईच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासल्या जातात. तर बदलापूरची क्षमता ५० चाचण्यांची आहे.  ‘एक यंत्र लवकरच प्रयोगशाळेत दाखल होणार असून आठवडाभरात प्रयोगशाळा कार्यान्वित होईल,’ असे कुळगाव-बदलापूरचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.

कोविड रुग्णालय सज्ज

कुळगाव-बदलापूर नगरपालिका संचालित बदलापुरातील पहिल्या कोविड रुग्णालयाचे शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी प्रशासक जगतसिंग गिरासे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, मुख्याधिकारी दीपक पुजारी उपस्थित होते. एकूण २५० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात ३० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या तसेच ५० ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे.