बदलापूर शहरातील करोनाबाधितांचे निदान वेळेवर व्हावे यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर  गाजावाजा करत २१ऑगस्ट रोजी प्रयोगशाळेचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ मिळत नसल्याने ही प्रयोगशाळा अद्याप सुरूच झालेली नसल्याचे सूत्रांकडून माहिती देण्यात येते.

बदलापूर आणि अंबरनाथ शहरातून अत्यावश्यक सेवेत सर्वाधिक कर्मचारी मुंबई आणि उपनगरात प्रवास करत असल्याने शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती होती. त्यातच चाचण्यांचे अहवाल मिळवण्यासाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा संशयिताचा करोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी सात ते आठ दिवस लागत होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे दिसून आले होते. असे असतानाच २ जुलै रोजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिका मुख्यालयात भेट देऊन अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यावेळी येत्या दहा दिवसात पाच प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरू होतील अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यातील एक प्रयोगशाळा ही अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेसाठी संयुक्तरीत्या असेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या प्रयोगशाळेची दररोज २ हजार चाचण्या करण्याची क्षमता असेल असे त्यांनी सांगितले होते.  आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेच्या महिनाभरानंतर या प्रयोगशाळेचे साहित्य शहराला मिळाले. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे लोकार्पणही करण्यात आले होते. मात्र लोकापर्ण होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप या प्रयोगशाळेत चाचण्या सुरू होऊ  शकलेल्या नाहीत.

तीन महिन्यांनंतरही चाचण्यांमध्ये वाढ नाही

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची सध्याची लोकसंख्या साडेसात लाखांच्या घरात आहेत. दोन्ही नगरपालिका मिळून दिवसाला अवघ्या ५०० चाचण्या केल्या जातात. अंबरनाथ शहरातील करोनाबाधितांची संख्या ६ हजार ६४७ वर पोहचली असून बदलापुरात आतापर्यंत ६ हजार ५७४ रुग्ण आढळून आले आहेत. अंबरनाथ शहरात आतापर्यंत २५ हजार चाचण्या पूर्ण झाल्या असून बदलापुरात मात्र ही संख्या १० हजारांवर आहे. तीन महिन्यांनंतरही चाचण्यांची संख्या या दोन्ही शहरांमध्ये वाढली नसल्याने प्रयोगशाळा निर्मितीचा हेतूच फोल ठरत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रयोगशाळा सुरू  करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसात प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल.

-दीपक पुजारी, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.