kalyanराज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शहरातील प्राथमिक सेवांकडेही फारसे लक्ष दिले जात नाही, अशी ओरड शिवसेना-भाजप युतीचे नेते सातत्याने करत होते. आता राज्यात युतीचे सरकार आहे. येथील शासकीय वैद्यकीय व्यवस्था ठोसपणे उभी राहावी यासाठी सरकारदरबारी जाऊन हवे ते पदरात पाडून घेण्याची धमक खरे तर युतीच्या नेत्यांनी दाखवायला हवी. या दोन्ही रुग्णालयांमध्ये कर्मचारी भरतीच्या प्रस्तावाला नुकतीच नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने तसे प्रयत्न होताना दिसत असले तरी रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी अधिक ठोस उपायांची आवश्यकता व्यक्त होत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयाला सुरुवातीपासूनच प्रशासकीय अनास्थेचा शाप मिळाला आहे. अत्यंत भव्य अशा वास्तूमध्ये ही रुग्णालये सुरू आहेत. रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी अपुरा कर्मचारी वर्ग, तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे येथील रुग्णसेवा रडतखडत सुरू आहे. माफक दरात, शासकीय वैद्यकीय सुविधांचा लाभ देणारी ही रुग्णालये जिवंत राहावीत यासाठी येत्या काळात ठोस अशी पावले उचलण्याची गरज आहे. 

दोन प्रमुख रुग्णालयांसह स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेमार्फत १५ दवाखाने, दोन सूतिकागृहे चालवली जातात. कल्याण पूर्व परिसरात यापूर्वीच नव्या रुग्णालयाचा शुभारंभ कार्यक्रम उरकण्यात आला आहे. कल्याणातील रुक्मिणीबाई रुग्णालयात एकाच वेळी १२० रुग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता आहे. तेवढीच क्षमता डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची आहे. दोन्ही रुग्णालयाच्या इमारती भव्य अशा उभारण्यात आल्या आहेत. सुमारे २०० कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने या रुग्णालयांचा गाडा हाकला जातो. दर्जेदार औषधे, सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधांचा लाभ या रुग्णालयात मिळत असल्याने सामान्य, मध्यम स्तरातील चाळी, झोपडपट्टीतील नागरिक या रुग्णालयांमध्ये नियमित औषधोपचारासाठी येत असतात. कल्याण, डोंबिवलीसह कसारा, शहापूर, मुरबाड या ग्रामीण भागातून रुग्णांचाही येथे राबता असतो. लोकसंख्या वाढते आहे त्या प्रमाणात येथील रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्या तुलनेत येथील व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी ठोस असे काही होताना दिसत नाही.

अपुरी व्यवस्था
अपुरा कर्मचारी वर्ग हे या दोन्ही रुग्णालयांचे मुख्य दुखणे आहे. ज्या ठिकाणी किमान ५०० ते ६०० कर्मचारी काम करणे आवश्यक आहे, तेथे जेमतेम २०० कर्मचाऱ्यांच्या बळावर कारभार सुरू आहे. एखाददुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अपवाद वगळला तर सात ते आठ प्रमुख विभागांमध्ये एकही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही. मानद सल्लागार, कंत्राटी तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृपेने नेत्ररोग, प्रसूती विभाग सुरू आहेत. नेत्ररोग विभागात डॉ. वीरेन पगारे, प्रसूती विभागात डॉ. अरविंद प्रधान व त्यांचे सहकारी नियमित सेवा देत आहेत. नेत्ररोग विभागात दर महिन्याला सुमारे १०० ते १२५ रुग्णांवर शस्त्रकिया तर प्रसूती विभागात दर महिन्याला ५० ते ६० महिलांच्या प्रसूती केल्या जातात. अशाच प्रकारचे त्वचा रोगतज्ज्ञ, दंतरोग, कान नाक घसा, बालरोग तज्ज्ञ, फिजिशिअन, जनरल सर्जन, पॅथॉलॉजी तज्ज्ञ, नेत्ररोग, शवविच्छेदन तज्ज्ञ डॉक्टर पालिका रुग्णालयांना उपलब्ध झाले तर हे सर्व विभाग पूर्ण क्षमतेने चालू शकतील. अनेक वर्षांपासून पालिकेला साधा फिजिशिअन डॉक्टर मिळू शकलेला नाही, अशी परिस्थिती आहे. ३८ तज्ज्ञ डॉक्टरांची पालिकेला आजघडीला आवश्यकता आहे. रुग्णालयातील ३०० खाटा, बाह्य़ रुग्ण विभागात येणारे हजार ते दीड हजार रुग्णांची तपासणी हा सगळा पसारा जेमतेम २३ तज्ज्ञ डॉक्टरांच्या जिवावर चालवला जात आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १२० खाटा उपलब्ध असल्या तरी प्रत्यक्षात ५० खाटांवरील रुग्णांना सेवा देऊ शकतील एवढाच कर्मचारी उपलब्ध आहे. डॉक्टरांचा अभाव, परिचारिका, वॉर्ड बॉय, आया, सफाई कामगार यांची जेमतेम संख्या यामुळे या रुग्णालयांचा गाडा कसाबसा हाकला जात आहे. रुग्णालयातील बालरोग, प्रसूतीपूर्व विभाग पूर्ण बंद आहेत. रुग्णालयाच्या भव्य डोलाऱ्याची सफाई करण्यास पुरेसा सेवक वर्ग नाही.

साहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती
रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करा, डॉक्टरांचे वेतन वाढवा म्हणून अनेक वेळा सर्वसाधारण सभेत ठराव झाले आहेत. नऊ वर्षांपासून महापालिका शासनाकडे तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर करा म्हणून आर्जव करीत आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देण्यास मंत्री, सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांना वेळ नाही. महापालिकेचा आस्थापनेचा खर्च ३५ टक्क्याहून अधिक होत असल्याने ही पदे मंजूर करणे शक्य होत नाही, अशी कारणे वेळोवेळी पुढे करण्यात आली आहेत. ही दोन्ही रुग्णालये शासनाच्या ताब्यात देण्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. त्याचेही भिजत घोंगडे पडले आहे. महापालिकेत नव्याने ९० तज्ज्ञ डॉक्टर हजर झाले तर परिचारकांपासून ते सफाई सेवकांपर्यंत सुमारे १५० कर्मचारी एकाच वेळी वाढवावे लागणार आहेत, तरच तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी टिकाव धरू शकतील. शस्त्रक्रिया विभागात ठरावीक कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या अनुभवामुळे शस्त्रक्रियेसाठी हे कर्मचारी जवळ नसतील तर तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रियेला सुरुवात करीत नाहीत. नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया खोलीत सेवा देत असलेल्या परिचारिका, साधने देणारा सेवक वर्ग उपलब्ध झाल्याशिवाय प्रसूती विभागातील शस्त्रक्रिया सुरू होत नाहीत, अशी नाजूक परिस्थिती पालिका रुग्णालयात आहे. सर्व तज्ज्ञ विभाग पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर सहकारी सेवक वर्गाची नोकरभरतीही तितकीच महत्त्वाची आहे. रुग्णालयात डॉक्टरांना राहण्यासाठी जवळच क्वार्टर्स असले की डॉक्टरांची धावपळ होत नाही. शास्त्रीनगर रुग्णालयालगत क्वार्टर्ससाठी ऐसपैस जागा होती. या जागेवर आता मनोरंजनाचे मैदान सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकाचा त्यासाठी आग्रह होता. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका प्रतीक्षा खोलीतील बाकडय़ावर बसून, झोपून वैद्यकीय सेवा देत असल्याचे धक्कादायक चित्र सध्या दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नावाने घोषणा करून मतदारांना भुलविण्यापेक्षा आहे ती व्यवस्था सक्षमपणे देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. येत्या दोन वर्षांत रुग्णालयातील आस्थापनेवरील नऊ डॉक्टर निवृत्त होत आहेत. ३८ वर्षे सेवेचा अनुभव असणारे हे डॉक्टर निवृत्त झाल्यानंतर पालिकेला तात्काळ, असे अनुभवी डॉक्टर मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मागील दहा वर्षांपासून पालिका प्रशासन डॉक्टरांच्या तुटवडय़ाचा अनुभव घेत आहे. त्यात तुटपुंज्या पगारावर तज्ज्ञ डॉक्टर काम करण्यास तयार नसतात. शासनाच्या आरोग्य विभागातील २५० डॉक्टर दोन वर्षांत निवृत्त होत आहेत. वाढीव मानधन, पगार देऊन तो तेथे राहण्यास तयार नसतो. अशा या अवघड परिस्थितीत नवीन आलेच नाही आणि निवृत्तांची पोकळी भरता आली नाही तर आधीच अत्यवस्थ असलेली आरोग्यसेवा भविष्यात जिवंत राहील की नाही, याची शाश्वती देणे आजघडीला तरी अशक्य आहे.

नगरसेवकांकडून दुजाभाव
पुरेशा प्रमाणात डॉक्टर नसल्याने रुग्णालयांमधील सोनोग्राफी, ईसीजी, कृत्रिम श्वसनयंत्र, अस्थी तज्ज्ञ विभागातील यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद आहे. महापालिका रुग्णालयात जी सुविधा माफक दरात मिळते, ती रुग्णांना खासगी सेवेतून दुप्पट किंमत देऊन घ्यावी लागते. नगरसेवकाच्या प्रभागातील कार्यकर्ता, त्याची पत्नी पालिका रुग्णालयात आल्यानंतर तेथे तिला उपचार मिळताना कसूर झाली की मग सर्वपक्षीय नगरसेवकांना पालिका रुग्णालयांची आठवण येते. सर्वसाधारण सभेत त्या दिवसापुरता रुग्णालय दुरवस्थेचा विषय उपस्थित करून सर्व नगरसेवक बेंबीच्या देठापासून ओरडून डॉक्टर, तेथील सेवकांवर आगपाखड करतात. या नगरसेवकांच्या अरेरावीमुळे काही डॉक्टर पालिका रुग्णालयातील सेवा सोडून निघून गेले आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाला अनेक वर्षांपासून पालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत असलेल्या, दूरदृष्टी असलेल्या डॉ. स्मिता रोडे या वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून लाभल्या आहेत. नवीन वैद्यकीय सेवेच्या चांगल्या प्रथा त्यांनी रुग्णालयात पाडण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे पुरेसा कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपचारासाठी कळवा तसेच मुंबईतील रुग्णालयांमध्ये रुग्णांना पाठविण्याचे प्रमाणही वाढले आहे.