28 October 2020

News Flash

भीषण पाणीटंचाईच्या भागातील ‘तलाव’ दुर्लक्षित

पाणीपुरवठा खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या मते या पाझर तलावातून पाणीपुरवठा करणे व्यवहार्य होणार नाही.

अंबरनाथ पश्चिम विभागातील जावसई गावालगत असलेला पाझर तलाव

जावसईतील पाझर तलाव गाळात जाण्याची भीती   

नवे निर्माण करता येत नाही आणि जुन्याची निगा राखली जात नाही, अशी सध्या ठाणे जिल्ह्य़ातील जल व्यवस्थापनाची परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या नागरीकरणाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक तपापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेली काळू आणि शाई हे दोन्ही धरण प्रकल्प अद्याप अस्तित्वात येऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत किमान उपलब्ध जलसाठय़ांचे तातडीने संवर्धन करणे आवश्यक असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. अंबरनाथ पश्चिम विभागातील जावसई गावालगत असलेला पाझर तलाव त्याचे ठळक उदाहरण आहे.

केंद्र शासनाच्या आयुध निर्माण कारखान्याच्या मागच्या बाजूस असलेल्या या पाझर तलावातून जावसई गावाला पाणीपुरवठा होत होता. या परिसरातील शेतीसाठी हे पाणी वापरले जाई. काळाच्या ओघात नळपाणी योजना आल्यावर गावातील विहिरी कालबाह्य़ ठरल्या आणि शेती उद्योग अस्तंगत झाला. गावाच्या वेशीवर पाझर तलाव मात्र तसाच पडून राहिला आहे. गेली कित्येक वर्षे या तलावाची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या तलावात बऱ्याच मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. शहरात स्वच्छतेचे वारे असले तरी या तलावात मात्र मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे. या पाझर तलावातील गाळ आणि कचरा काढला, तर या पाझर तलावाचे छोटय़ा धरणात रूपांतर करणे शक्य असल्याचा निर्वाळा जलतज्ज्ञांनी दिला आहे. मात्र मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करणारे शासन या तलावाच्या जीर्णोद्धाराबाबत उदासीन आहे. शासनाने जलयुक्त शिवाराअंतर्गत या तलावातील गाळ उपसावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

पाणीपुरवठा खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या मते या पाझर तलावातून पाणीपुरवठा करणे व्यवहार्य होणार नाही. बाराही महिने पुरेल इतका पाणीसाठा येथे होऊ शकणार नाही, असे म्हणणे आहे. मात्र आता एप्रिल महिन्यातही या तलावात पुरेसा जलसाठा आहे. विशेष म्हणजे खालच्या भागात असलेल्या जावसई गाव परिसराला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावते. पावसाळ्यानंतरचे चार महिने जरी त्यांना पाझर तलावातून पाणीपुरवठा झाला, तर खूप मोठा दिलासा मिळू शकेल, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.

सध्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. अंबरनाथमधील हा तलाव तर कितीतरी मोठा आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना पाणीपुरवठय़ासाठी एक अतिरिक्त जलस्रोत सहज उपलब्ध होऊ शकेल.

हेमंत जगताप, जलतज्ज्ञ, रोटरी विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 3:27 am

Web Title: lakes neglected in the areas of severe water scarcity in thane district
Next Stories
1 ठाण्यात छुपी वृक्षतोड सुरूच?
2 ‘पापडखिंड’चा मृत्यू अटळ
3 शहरबात : शहर बकालीचा भस्मासुर
Just Now!
X