वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेचा निर्णय

बदलापूर : शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांची शहरातच व्यवस्था करण्यासाठी पालिकेने आता विविध सभागृह, मंगल कार्यालये आणि इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्वच ठिकाणी कोविड काळजी के ंद्र, आरोग्य के ंद्र आणि रुग्णालये उभी केली जाणार आहे. आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलापूर शहरात करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सोनिवली येथील बीएसयूपी प्रकल्पातील विलगीकरण आणि कोविड काळजी के ंद्र कार्यान्वित आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्यानंतर शहरातील खाटांची क्षमता वाढण्यासाठी वेगाने सूत्रे हलली आहेत. त्यानुसार शहरात अस्तित्वात असलेल्या विलगीकरण के ंद्राच्या ३६० खाटांसह पूर्वेतील ज्युवेली येथील अरिहंत वाटिका येथे २७६ तर शिरगाव येथील आर्यन वन या गृहप्रकल्पात ७१ खाटा अशा एकूण ७०७ खाटांची व्यवस्था केली जाते आहे. तर बीएसयूपी प्रकल्पात सध्याच्या घडीला ५२० खाटांची व्यवस्था असली तरी ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने विविध मंगल कार्यालये, सभागृह आणि रिकामे गृहप्रकल्प ताब्यात घेतली जात आहेत. यात पश्चिमेतील रेनी रेसॉर्ट येथे ५०, चामटोली येथील सह्यद्री मंगल कार्यालयात १००, बदलापूर गाव रस्त्यावरील आनंद लॉन्स येथे ५० तर पूर्वेतील जान्हवी मंगल कार्यालयात ५० खाटा अशी एकूण ८२० खाटांची व्यवस्था केली जात आहे. त्यासोबत कोविड आरोग्य केंद्रासाठी पूर्वेतील पेंडुलकर सभागृहात १०० तर पश्चिमेतील गौर मंगल कार्यालयात १०० खाटांची व्यवस्था केली जाते आहे. या ठिकाणी काम सुरू आहे.

ही केंद्र सुरळीत चालण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने वैद्यकीय पदांची तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात सहा वैद्यकशास्त्रतज्ज्ञ, दोन सूक्ष्मजीवशास्त्र, सहा अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, १५ एमबीबीएस डॉक्टर, १५ बीएएमएस, १५ बीएचएमस आणि ३० परिचारिकांचा समावेश आहे. याशिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, ऑक्झिलरी परिचारिका, खाट साहाय्यक, माहिती नोंदणीकार अशा पदाचांही समावेश आहे. पालिकेने एकूण १८७ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून २३ जुलैपासून या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे.

५० लाख विम्याचे आश्वासन

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बदलापुरात यापूर्वी कमी डॉक्टर पुढे आले होते. त्यामुळे या वेळी पालिकेने अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाखांचा विमा देऊ  केला आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला प्रतिसाद मिळण्याची पालिकेला आशा आहे.