‘लोकसत्ता ९९९’मध्ये ठाण्यातील आबालवृद्धांचा सहभाग

ठाणे : नवभक्ती, नवरंग आणि नवरात्री असा तिहेरी संगम असलेल्या ‘लोकसत्ता ९९९’ या अनोख्या स्पर्धेचा सहावा भाग ठाण्यातील प्रभात नगर भागातील ‘जय अंबे मित्र मंडळ’ या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात सोमवारी रात्री पार पडला. यावेळी जय अंबे मित्र मंडळातील महिलांचा भोंडला लक्षवेधी ठरला. उखाणे आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धेबरोबर नृत्य, पाककला, प्रश्नमंजूषा यासारख्या विविध स्पर्धानी सोहळ्यात रंगत आणली. आबालवृद्धांच्या सहभागामुळे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्यात आनंद, उत्साहाच्या नवरंगांचा वर्षांव झाला.

नवरात्रोत्सव केवळ गरब्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या मराठमोळ्या संस्कृतीशी त्याचा मिलाफ घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘नवभक्ती, नवशक्ती आणि नवरंग ९९९’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. राम बंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ अंतर्गत या उपक्रमाच्या ठाणे येथील कार्यक्रमास अभिनेत्री ऋजुता देशमुखची विशेष उपस्थिती होती. स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रश्नमंजूषा कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली. फुगे फुगवून ते फोडणे, बाटल्यांमध्ये पाणी भरणे असे रंजक खेळही खेळण्यात आले. या खेळांतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

मंडळातील स्थानिक दाम्पत्यांसोबत हार, कंबर पट्टा, पैंजण असा गमतीदार खेळ खेळण्यात आला. खेळात बाद होणाऱ्यांनी आपल्या अर्धागिनीला उचलून घेतले तर काही जोडप्यांनी उखाणे घेतले. मंडळातील हौशी महिलांनी यावेळी नृत्य सादर केले. लावणी, जोगवा अशी समूहनृत्येही यावेळी सादर करण्यात आली. ‘श्री व सौ’च्या स्पर्धेत जिंकलेल्या गिरीश आणि गायत्री या कडव दाम्पत्याला ‘एम. के घारे ज्वेलर्स’तर्फे एक लखलखता हार भेट देण्यात आला.

‘दिवाळी फराळ’ या पाककला स्पर्धेत विविध वयोगटांतील महिला उत्साहाने सहभागी झाल्या. या स्पर्धेत स्वप्ना सांगवे, स्वप्नाली राणे, दिग्विजा लाड, निकीता कळंबळे, स्मिता तोरसकर या विजेत्यांना ‘राम बंधु मसाले’तर्फे  पारितोषिके देण्यात आली. स्पर्धकांनी अष्ट लाह्य़ा चिवडा, ओट्स लाडू, चंपाकली, पानांचे लाडू, ज्वारीची चकली आणि चिवडा यासारखे चमचमीत पदार्थ तयार केले होते.

या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वसामान्य महिलांच्या रोजच्या धकाधकीतून क्षणभर विश्रांती मिळते. महिलांचा उत्साह अतिशय दांडगा आहे. ‘लोकसत्ता ९९९’ हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे, असे मत अभिनेत्री आणि पाककृती परीक्षक ऋजुता देशमुख हिने व्यक्त केले.

ठाणे महापालिकेच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी पतीसह या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाला ‘राम बंधु’चे भानुदास गुनकर, कविता मेढेकर, स्वप्ना मानकर, सतीश सिंह, रोहीत झुंझारराव, गणेश वेखंडे, मितेश कोर्डे, अरूण राणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस ठाण्यातील ‘जय अंबे मित्र मंडळा’ला केसरी टूर्सच्या प्रमोद दळवी यांच्या हस्ते ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

आज अंधेरीत.

बुधवार, १७ ऑक्टोबर रोजी नवदुर्गा मित्र मंडळ, कल्पिता एनक्लेव्ह जवळ, सहारा रोड, अंधेरी (प.) मुंबई-४०००६९ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

प्रायोजक

रामबंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’चे सहप्रायोजक केसरी टूर्स, कलर्स आणि रिजन्सी ग्रुप आहेत. कार्यक्रम ‘पॉवर्ड बाय’ एम. के. घारे ज्वेलर्स असून, अपना सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर आहेत.

‘लोकसत्ता ९९९’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महिला तसेच लहान मुलांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते. नागरिकांच्या धकाधकीच्या जीवनात अशा कार्यक्रमांमुळे नवरंग भरले जतात.

– भानुदास गुनकर,  वितरण व्यवस्थापक, रामबंधु मसाला