तारांकित सारस्वतांच्या ‘अभिजात’ कवितांचा ठाण्यात जागर

ठाणे : प्रभाकराची पावले मावळतीला वळली आणि दूर पश्चिमेला फाल्गुनातील पळस फुलांच्या केसर रंगांनी क्षितिजाच्या समेवर पाखरांच्या किलकिलाटांचे प्रतिध्वनी ओंजळीत धरून सांझराग छेडला. लांब नभात अशी समष्टीची कविता आकार घेत असताना इकडे शिलाहाराच्या राजधानीत अर्थात ठाण्यातही नुकत्याच प्रज्ज्वलीत झालेल्या काव्यज्योती नभातील काव्यगुंजारवाशी एकरूप होऊ पाहत होत्या. निमित्त होते ‘लोकसत्ता’ने खास मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या काव्यमैफलीचे.

कविता संपली.. मराठीही संपेल.. अशी ओरड सुरू असलेल्या मराठीच्या संक्रमणाच्या या काळात ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ‘लोकसत्ता’ने एक संध्याकाळ कवितेला वाहिली आणि या काव्यजागरात सहभागी झालेल्या तारांकित सारस्वतांच्या थेट हृदयात उतरणाऱ्या रचनांनी तब्बल तीन तास श्रोत्यांना जागेवर खिळवू ठेवले आणि आपल्याच माय मराठीच्या श्रीमंतीचे देखणे अन् अविस्मरणीय दर्शनही घडवले.

या काव्यगाथेच्या चिरंतन पारायणाच्या प्रारंभी मंचावर आलेल्या मधाळ आवाजाच्या कवयित्री निरजा असोत की अगदी शेवटी आपल्या खर्जातल्या आवाजात गरजणारे नाना पाटेकर असोत. भरवीच्या स्वरांनी गंधाळलेल्या चाफ्याच्या फांद्याफांद्यावर डोलत भ्रमर जसा कमलपुष्पात विसावतो तसेच व्हाया सोनाली कुलकणी, मुक्ता बर्वे, सौमित्र, अशोक नायगावकर, प्रतीक्षा लोणकर, मिलिंद जोशी असा हा कवितेचा काफिला फाल्गुनमासातल्या चांदणराती चांदण्यांच्याच रथावर स्वार होऊन कवितेच्या प्रांगणात मुक्त विहरला.

शब्दांनी लगडलेल्या या कवितेच्या रेशमी लडींना ओंजळीत साठवून पहिल्यांदा मंचावर आल्या त्या कवयित्री नीरजा. नामदेव ढसाळांच्या ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितेतील ‘हे शहर आता माझे राहिले नाही’ ही व्यथा नीरजा यांनी आजच्या दुभंगाच्या स्थितीवर अतिशय पोटतिडकीने सादर केली. माणूस होण्याचा इतिहास या कवितेतून त्यांनी, ‘माझ्यातील चित्रकाराला सापडत नाही एकही कोरा कोपरा..’असे सांगत स्त्री वेदनांचे वास्तव मांडले. नीरजा यांचा निरोपाचा हात हलला आणि मुक्ता बर्वे मंचावर प्रकटल्या. सोबतीला कवी, चित्रकार, गायक मिलिंद जोशी होते. देवळातल्या झुंबरातला हरवलेला लोलक चिमुकल्यांच्या डोळ्यांतून आज कसा चकाकतोय हे सांगताना त्यांनी चिंतनाला ऐहिकतेच्या पातळीवर नेऊन सोडले. मिलिंद जोशी यांनी ‘बायोडिग्रेटेबल’ या कवितेतून व्यक्त होऊ पाहणाऱ्या प्रवाहाला अडवणाऱ्या श्वासांच्या कथा अगदी रंग, रूप, नादासह सांगितल्या. शब्दातच गझल अभंग.. शब्दातच ओवी दंग.. शब्दातच फिके पडावे.. शब्दात सापडे रंग.. असा शब्द अन् भावनांचा अवघा रंग एकची होत असताना निवेदकाने सोनाली कुलकर्णी आणि सौमित्र यांना साद घातली. दोघांचेही क्षेत्र अभिनयाचे, पण कविता मन-मेंदूत स्थिरावलेली. तिला दोघांनीही अतिशय कौशल्याने ओठांवर आणले.

आता शेतकरी आत्महत्यांची राजधानी झालेल्या वऱ्हाडातील अमरावतीच्या टोकावरील जळू गावातील मरणयातना पाहून हादरलेल्या सोनाली यांनी त्यांच्याही नकळत या यातनांना कधीतरी शब्दात बांधले होते. आज इतक्या वर्षांनी तीच वेदना त्यांनी रसिकांसमोर मांडली आणि काही क्षण अवघे सभागृह शुन्यात बुडाले.

अभिनेते, कवी किशोर कदम, ‘सौमित्र’ यांनी वेदनांची हीच लय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बंधनाशी जोडून वर्तमान स्थितीवर प्रखर भाष्य केले. मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या या कवितांच्या प्रभावात धीरगंभीर झालेल्या रसिकांना अशोक नायगावकरांनी मात्र विनोदाच्या झोपाळ्यावर मनसोक्त झुलवले. त्यांच्या मुळाक्षराच्या कवितेने तर विनोदाची झालर पांघरून श्रोत्यांना पार चिंतनकक्षेच्या समेवर नेऊन उभे केले. श्रोते अद्याप या संमिश्र अनुभवाच्या हिंदोळ्यावर असताना नायगावकरांची पावले परत वळली आणि त्यांनी मंच सोडण्याआधी अवघ्या सभागृहाने उभे राहून त्यांच्या काव्यसाधनेला दिलखुलास दाद दिली.

काव्यताऱ्यांच्या या लखलखाटात शुक्रताऱ्याच्या जुळण्याची वेळ येऊन ठेपली होती. हा शुक्रतारा अर्थातच प्रतीक्षा लोणकर होत्या. त्यांनी नायगावकरांची ज्योतिबा आभाळ आणि एका अनामिक कवीची रोज एक नेम कर.. ही कविता सादर केली. कवितेने एकाच वेळी आपले बाहू चहूदिशांना फैलावून शब्दांना कवेत घ्यावे इतक्या उत्कटतेने श्रोत्यांनी नाना पाटेकरांच्या आगमनाच्या वर्दीला जणू बाहू पसरवून कवेत घेतले. नानांनी आपल्या धीरगंभीर आवाजात चि. त्र्यं. खानोलकरांच्या आशयघन काव्यवर्षांवात श्रोत्यांना चिंब भिजवले. रसिकांच्या आग्रहाखातर जावेद अख्तर यांच्या ‘वजूद’ चित्रपटातील कैसे बतावू तुम्हे.. ही कविता सादर केली.

नांदी ते भरवी तीन साडेतीन तास हा काव्यजागर अखंड सुरू होता आणि त्याची ही अखंडता शाबूत ठेवण्याचे खरे श्रेय होते या कार्यक्रमाचे निवेदन करणारे कृणाल रेगे यांचे. अंधारू पाहणाऱ्या मराठीच्या क्षितिजावर ही मैफल एका पणतीच्या रूपात तेजाळावी आणि समोर बसलेल्या शेकडो पणत्यांनी हा उजेड कवेत घेऊन या इवल्याशा मैफिलीचे भव्य साहित्य संमेलनात रूपांतर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकातून केले. श्रोत्यांचे शाब्दिक स्वागत ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.

प्रायोजक

कार्यक्रमाचे प्रायोजक ‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी, मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स, टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा,  हॉस्पिटलिटी पार्टनर हॉटेल खवय्ये आणि आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे आहेत.