सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन चोरांना अटक 

१ कोटी रुपयांची चोरी यशस्वी करून फरार झालेल्या एका तरुणाला लोभापायी आपला जीव गमवावा लागला. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने चोरी केली होती, मात्र अधिक पैशापायी तो सहकाऱ्यांना ब्लॅकमेल करत होता. अखेर दोघा सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली. याप्रकरणी दोन्ही मारेकऱ्यांना अटक झाली असून मुंबईच्या सराफाच्या दुकानातील चोरीचाही उलगडा झाला आहे.

वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नारायण सेवक (२८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. नारायण सेवक असे त्याचे नाव होते आणि तो सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी शीव येथील काजल ज्वेलर्स या दुकानात चोरी केली होती. तब्बल एक कोटी रुपयांचे सोने चोरले होते. नारायण सेवक याला त्याच्या वाटेतील २ किलो सोने मिळाले होते. ते सोने घेऊन तो वसईत आपले साथीदार मदनलाल सेवक (२८) आणि श्रवण सेवक (१९) या भावांकडे आला होता. त्याच्याकडे दोन किलो चोरीचे सोने होते. परंतु तो मदनलालला ब्लॅकमेल करण्यासाठी आला होता. मदनलाल याने दुसरे लग्न केले होते, ते लपवून ठेवण्यासाठी तो मदनलालकडे पैसे मागत होता. त्यामुळे या दोघा भावांनी त्याची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गाडीत टाकून वाडा येथील जंगलात नेत होते. त्याच वेळी नाकाबंदीत पोलिसांना या गाडीत मृतदेह आढळला.

माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून मदनलाल आणि श्रवण या दोन्ही भावांना अटक केली. त्यांनी घरात आणि गोदामात दडवून ठेवलेले ४५ लाख रुपयांचे सोनेही हस्तगत केले आहे. याबाबत बोलताना माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी भाऊ  मृतदेह नष्ट करण्यासाठी जंगलात नेत होते. मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि आम्ही पुढील तपास केला. नारायण सेवक याचे सोने लंपास करण्यासाठी ही हत्या केली असावी, अशीही शक्यता आहे.