News Flash

उच्च शिक्षणातील करिअरच्या नव्या वाटांवर प्रकाश!

हा उपक्रम येत्या शनिवार आणि रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ शनिवार, रविवारी ठाण्यात; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

उच्च शिक्षणाची सुरुवात बारावीनंतर होत असली तरी दहावी हा त्याचा पाया असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे, हे ठरवूनच विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपेक्षित गुण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, सध्या करिअरचे इतके पर्याय उपलब्ध झाले आहेत की, अनेकदा विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमात पडतात. विद्यार्थी-पालकांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम येत्या शनिवार आणि रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या आवडीच्या विषयात करिअर करायला मिळण्यासारखे सुख नाही. परंतु हे व्हायचे कसे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. त्यासाठीच आवश्यक असते तज्ज्ञांचे मार्गदर्शन. योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी योग्य मार्ग मिळाल्यास पुढची वाटचाल सुकर होत जाते. म्हणूनच ‘लोकसत्ता’तर्फे १९ व २० नोव्हेंबर रोजी ‘मार्ग यशाचा’ उपक्रमाचे ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, करिअर समुपदेशक विवेक वेलणकर, प्रा. किशोर चव्हाण, करिअर समुपदेशक प्रथमेश आडविलकर आदी तज्ज्ञ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील आणि त्यांच्या शंकांना उत्तरेही देतील. या कार्यशाळेत दोन्ही दिवस समान विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटक म्हणून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित असतील.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक असलेल्या ‘नीट’ या प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी साठय़े कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. किशोर चव्हाण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते या परीक्षेविषयी अधिक माहितीही देणार आहेत. आजच्या जगात स्पर्धा काही कोणाला चुकलेली नाही. त्यामुळेच या स्पर्धेशी कसे जमवून घ्यावे, या विषयी डॉ. राजेंद्र बर्वे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तर ज्यामागे आपण धावत असतो, त्या यशाची नेमकी व्याख्या तरी काय? यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी संवाद साधतील. करिअरचे यशस्वी पर्याय आणि शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या विषयी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ओळख करून देतील. परदेशी शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना आकर्षण असते, पण त्यात नेमक्या कोणत्या संधी आहेत हे करिअर समुपदेशक प्रथमेश आडविलकर उलगडून दाखवतील. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच शंकांनाही वेळ दिला जाणार आहे.

प्रायोजक

या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस असतील; तर पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ हे आहेत. हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर असतील.

  • कधी – १९,२० नोव्हेंबर
  • वेळ – स. ९.३० ते ४.३०
  • कुठे – टिपटॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे
  • प्रवेश – विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:27 am

Web Title: loksatta marg yashacha program 3
Next Stories
1 रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा पर्याय
2 अपंगांचा रेल्वे प्रवासही खडतर
3 नोटांच्या रांगेतून मतांच्या वाटा!
Just Now!
X