ठाणे स्थानकात तिकीट खिडक्यांसमोर लांबचलांब रांगा; महिलावर्गाला फटका

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रणेत (एटीव्हीएम)  सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानकातील तिकीट खिडक्यांबाहेर प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

ठाणे रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. करोना र्निबधामुळे सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी नसली तरीही, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच महिला प्रवाशांची या स्थानकात सकाळी नेहमीच गर्दी असते. मात्र, सोमवारी सकाळी या गर्दीचे भयंकर रूप पाहायला मिळाले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एटीव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. यामुळे तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र होते. दरम्यान, एटीव्हीएम यंत्रात कोणताही बिघाड झाला नव्हता असे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र प्रत्यक्षदर्शिनी किमान दोन तास सगळीच यंत्रणा बंद होती असे सांगितले.