उल्हास नदीच्या पातळीत घट झाल्याने प्रशासनाचा निर्णय; पाऊस येत नाही तोपर्यंत पाणीकपात कायम

पावसाचे आगमन लांबले असतानाच उल्हास नदीतील पाण्याची पातळी आणखी खालावत चालली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कल्याण-डोंबिवली शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय बुधवारी पाणीपुरवठा विभागाने जाहीर केला. तूर्तास पाणीकपात वाढविण्यात येणार नाही, परंतु कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील पाणीपुरवठा बुधवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णयही तातडीने अमलात आणण्यात आला.

उल्हास नदीतील पाण्याची पातळी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. मंगळवारी महापालिकेस उपलब्ध होणारे पाणी पुरेशा प्रमाणात मिळाले नसल्याने कल्याण पश्चिमेतील पाणीपुरवठा तातडीने बंद करावा लागला. ऐन वेळेस पाणी बंद झाल्याने कल्याणकरांची तारांबळ उडाली. दरम्यान पुढील काही दिवस कल्याण पूर्व व डोंबिवली शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मंगळवारी शहरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. बुधवारी तातडीने लागू करण्यात आलेल्या कपातीमुळे रहिवाशांचे हाल झाले.

जांभूळपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज हजार दशलक्ष लिटर पाण्याचा विसर्ग केला जातो, तर कालव्यातून ४५० ते ५०० दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते. नदीत शिल्लक असणारे पाणी आणि धरणातून तसेच कालव्यातून नदीत सोडण्यात येणारे असे एकूण १६०० दशलक्ष लिटर पाणी दररोज उल्हास नदीतून उचलण्यात येते. मात्र नदीतील पाण्याची पातळी मंगळवारी १.४४ मीटरने घटल्याने महापालिकांची तारांबळ उडाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेला बुधवारी अचानक पाणी बंदची घोषणा करावी लागली.  नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीकपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे १५ जूनपर्यंत पाणी पुरेल, अशी शक्यता आहे.

धरणात ११ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने बंधाऱ्यापासून दीड मीटरने पाणी साठा खाली गेला आहे. यामुळे कल्याण पश्चिमेतील पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच कल्याण पूर्व व डोंबिवली शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणे शक्य नाही. पाऊस पडल्याशिवाय नागरिकांना पाणी कोठून देणार हा प्रश्नच आहे

–  तरुण जुनेजा, कडोंमपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता