तहसीलदारांच्या पत्रातून खुलासा

सागर नरेकर, बदलापूर

उल्हास नदीला पूर आला असून रेल्वे रुळांवरही पाणी आले आहे याची स्पष्ट कल्पना देऊनही रेल्वे यंत्रणेने २६ जुलै रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर स्थानकातून पुढे सोडली, असा अहवाल ठाणे जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे. तसेच प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे.

उल्हास नदीची पातळी सातत्याने वाढत असतानाही बदलापूर स्थानकातून एक्स्प्रेस पुढे नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातून २६ जुलै रोजी पाऊस वाढताच रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वेच्या बदलापूर विभागाच्या उपप्रबंधक कार्यालयात दूरध्वनी करून पूरस्थितीची कल्पना दिली होती. रुळांवर पाणी साचले असून बदलापूर स्थानकातून कोणतीही गाडी पुढे सोडू नका असे स्पष्ट शब्दात बजावण्यात आले होते. बदलापूर ते वांगणीदरम्यान पुराचे पाणी सातत्याने वाढत होते, याची कल्पना देऊनही रेल्वे प्रबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसील विभागातील कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत उद्धटपणे संवाद साधला, असा आरोप अंबरनाथ तहसीलदारांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलेल्या पत्रात केला आहे.

तहसीलदारांच्या पत्रातील आरोप 

कर्जत, उल्हास नदीपात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै रोजी अंबरनाथ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती देण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयातून तहसीलदार जयराज देशमुख यांच्या वतीने कोतवाल रवींद्र शिंदे यांनी उप स्थानक प्रबंधकांशी संपर्क साधला. याबाबत आमच्या कर्मचाऱ्यांशी बोला असे उप स्थानक प्रबंधकांनी सांगितले. त्यामुळे कारकुनाच्या माध्यमातून स्थानकातील कर्मचाऱ्यांना तालुक्यातील पूरस्थितीची माहिती देण्यात आली. तसेच स्थानकातील स्थितीबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावर तेथील कर्मचाऱ्याने उद्धट भाषेत तहसीलदार जयराज देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्याने तहसीलदारांना, ‘तहसीलदार असलात म्हणून काय झाले, तुम्ही राज्य सेवा आयोगातून आला आहात, आमचे साहेब केंद्रीय लोकसेवा आयोगातून आले आहेत, असे सुनावले. स्थानकातील उप प्रबंधकांना पुराची कल्पना देऊनही त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे जाऊ  दिली, असा आरोप तहसीलदार देशमुख यांनी केला आहे. रेल्वेच्या कल्याण विभागातील साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. माहिती देऊनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घातला, असा आरोपही केला आहे.  यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचारी हे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाईस पात्र असल्याचे तहसीलदारांनी म्हटले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसबाबत स्थानिक जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला संदेश अथवा माहिती देणे गरजेचे होते.  तसा संदेश आला असता तर त्याची नोंद  आमच्याकडे असती. पण आमच्या नियंत्रण कक्षाकडे तसा संदेश आल्याची नोंद नाही. अशा प्रसंगी संबंधित यंत्रणांनी कसे काम करावे, याची पद्धत ठरलेली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेबाबत दिलेला अहवाल पाहिल्यानंतर निर्णय घेऊ.

– अनिल कुमार गुप्ता, मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक

२६ जुलै रोजी रेल्वे प्रशासनाला ज्या गोष्टी सांगणे महत्त्वाचे होते त्या सांगण्यात आल्या होत्या. आमच्या कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांचे संभाषण अरेरावीचे होते. ही वस्तुस्थिती आम्ही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केली आहे. अशा प्रकरणात कारवाई अपेक्षित आहे आणि पत्रात आम्ही तशी मागणीही केली आहे. पुढील निर्णय रेल्वे प्रशासनाचा आहे.

– जयराज देशमुख,  अंबरनाथ तहसीलदार