डोंबिवलीतील सुमारे शंभर रिक्षा दररोज महापे येथील ‘सीएनजी’ केंद्रावर गॅस भरण्यासाठी जातात. गॅस भरल्यानंतर परतीच्या प्रवासावर असलेल्या या रिक्षांचे चालक येताना महापे ते डोंबिवली दरम्यान प्रत्येकी ३० ते ४० रुपये आकारून प्रवासी वाहतूक करू लागले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या गॅसच्या गरजेतून प्रवाशांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे. या मार्गावर रिक्षाची प्रवासी सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची जुनी मागणी आहे. मात्र, रिक्षा संघटना या मागणीस दाद देताना दिसत नाहीत. मात्र, सीएनजी गॅस भरण्याच्या निमित्ताने का होईना प्रवाशांना महापे ते डोंबिवली नियमित रिक्षा प्रवास घडू लागला आहे.
रिकामी रिक्षा घेऊन जाण्यापेक्षा महापे येथे गॅस भरण्यासाठी जाताना डोंबिवलीतील रिक्षाचालक मिळेल तसे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे भाडे मिळते. गॅस भरून परत येताना हे रिक्षाचालक बस थांबे सोडून अन्यत्र उभे असलेले प्रवासी भाडे म्हणून घेतात. दररोज सकाळी महापे भागात जाताना आणि संध्याकाळी परतीच्या वाटेवर असताना नवी मुंबई परिवहन, कल्याण परिवहन सेवेच्या बस प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. या गर्दीतून प्रवास करून अनेक प्रवासी हैराण झालेले आहेत. महिला प्रवासी तर बसचा प्रवास नको अशा मन:स्थितीत असतात. त्यापेक्षा दोन पैसे जास्त देऊन खासगी वाहनाने प्रवास करण्याचा त्या प्रयत्न करतात. रिक्षाने दोन पैसे जास्त देऊन प्रवास केला की लोकलच्या प्रथम श्रेणीने प्रवास केल्याचे समाधान मिळते, असे काही महिला प्रवाशांनी सांगितले.
महापे परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये डोंबिवली परिसरातील नागरिक नोकरीसाठी जातात. हे प्रवासी बस थांबा सोडून महापे येथे जाणारी रिक्षा शोधतात. थेट प्रवास करायचा असेल तर रिक्षाचालक २५० ते ३०० रुपये भाडे सांगतात. तसेच, महापे येथून स्वतंत्र रिक्षा करून यायचे असेल तर तेवढेच भाडे प्रवाशाला मोजावे लागते. परंतु, अलीकडे रिक्षाचालक सीएनजी गॅस भरण्यासाठी महापे येथे नियमित जातात. त्यामुळे हे रिक्षाचालक रिकामी रिक्षा नेण्यापेक्षा रस्त्यावरून जाताना चार प्रवासी शोधत प्रवास करतात. त्या निमित्ताने भाडे सुटते. तसेच, ३० ते ४० रुपयांमध्ये महापे येथे जाणे प्रवाशांना परवडते. येताना हेच रिक्षाचालक अशाच पद्धतीने भाडे घेत डोंबिवलीकडे परत येतात. त्यामुळे जाताना १२० ते १४० आणि येताना तेवढेच भाडे चालकांना मिळतेत. ये-जा करून रिक्षाचालकांना एकूण २५० रुपयांचे भाडे मिळते. यामध्ये सीएनजी गॅसचे देयक भरणे शक्य होते, असे मनोज सरोदे या रिक्षाचालकाने सांगितले.

बसच्या कटकटीला नवा पर्याय  
सकाळी, संध्याकाळी नवी मुंबई, महापे परिसरात जाण्यासाठी प्रवाशांकडे पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत. केडीएमटी तसेच एनएमएमटीच्या मर्यादित बसेसमुळे या मार्गावरील प्रवासी घायकुतीला आलेले दिसतात. त्यामुळे हा प्रवास नकोसा वाटतो. याउलट नियमित डोंबिवली, कल्याण ते महापे दरम्यान रिक्षा वाहतूक सुरू झाली तर या प्रवासाला नक्कीच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. महापे येथील बस थांब्यावर अर्धा ते एक तास थांबूनही रिकामी बस उपलब्ध होत नव्हती. कोकण भवन, वाशी येथून बस भरून येतात. त्यामुळे मधल्या थांब्यांना या बस अनेक वेळा थांबत नाहीत. बस मिळाली तरी खच्चून भरलेली असते. या सगळ्या पाश्र्वभूमीवर महापे ते थेट डोंबिवली रिक्षा उपलब्ध झाली तर आरामात या प्रवासासाठी तीस ते चाळीस रुपये देणे काहीच महाग नाही, असे काही प्रवाशांनी सांगितले.