घरात परवानगी नाकारली; १३ हॉटेलांमध्ये अलगीकरण केंद्र

भाईंदर : मीरा-भाईंदरमधील करोनाबाधित रुग्णांना घरात अलगीकरणास बंदी घातल्यानंतर पालिकेने १३ खाजगी हॉटेलमध्ये अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. ही हॉटेल महागडी असून यामुळे रुग्णांवर आर्थिक भार पडणार आहे. अलगीकरणाचे खाजगीकरण करण्याच्या या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. इतर शहरांप्रमाणे मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.

मंगळवार ७ जुलैच्या अहवालानुसार शहरातील एकूण ४ हजार ६३३ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. शहरातील रुग्ण वाढीचा वेग प्रति दिवस १४० ते १५० इतका झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असताना सौम्या आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच अलगीकरणात ठेवण्यास सर्व महापालिकांनी परवानगी दिलेली आहे. परंतु मीरा-भाईंदर महापालिकेने घरात अलगीकरणाचा परवानगी नाकारली.

शहरात पालिका अलगीकरण केंद्र तयार करून या रुग्णांची सोय करेल असे सर्वाना वाटले होते. मात्र पालिकेने चक्क १३ खाजगी हॉटेलांमध्ये अलगीकरणास परवानगी दिलेली आहे. या हॉटेलमध्ये अलगीकरण करण्याकरिता नागरिकांकडून प्रति दिवस तब्बल अडीच हजार रुपयाची आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ १२ दिवस अलगीकरण होण्यास गेलेल्या नागरिकांना साधारण ३० हजार रुपये मोजावे लागणार आहे. विशेष बाब एरवी या हॉटेलमधील खोल्यांचे भाव २ हजार पेक्षा देखील कमी आहेत. म्हणजे रुग्णांची आर्थिक लूट करण्यासाठी दर वाढवले आहेत का असा सवाल नागरिकांनी केला आहे

या हॉटेलमध्ये गेलेल्या रुग्णांना हॉटेलच्या एका खोलीतच रहावे लागणार आहे. पालिकेच्या या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. शहरात अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असून खाजगी हॉटेलमध्ये अलगीकरण करण्याची आवश्यकता नसल्याचे मत मांडण्यात येत आहे. शिवाय पालिकेमार्फत महिन्याभरापूर्वी अलगीकरण केंद्राकरिता ठरवण्यात आलेल्या जागेचे कामदेखील अद्याप पूर्ण झाले नसून केवळ भाजपमधील हॉटेल मालकांच्या आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्याकरिता हे घडत असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता आयुक्त डॉ. विजय राठोड यांना सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जाहीर केलेले खाजगी हॉटेल

हेरोटेज रिसोर्ट, हॉटेल समाधान, हॉटेल एस. ए. रेसिडेन्सी , जी.सी.सी. नॉर्थ साईड हॉटेल, हॉटेल शेल्टर, हॉटेल जया महाल (बंटास), हॉटेल प्रसाद इंटरनॅशनल,  हॉटेल व मेरीयाड , हॉटेल सनशाईन इन, हॉटेल सिल्व्हरडोअ, हॉटेल चेना गार्डन, आनंद लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंग,आणि हॉटेल अ‍ॅक्वा रिजेन्सी इत्यादी हॉटेलचा समावेश करण्यात आला आहे.