ऋषिकेश मुळे

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान ठाणे जिल्ह्य़ातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे नसणे, नावे शोधण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश, मतदारांच्या नावांच्या चिठ्ठय़ा वाटपातील गलथान कारभार तसेच दुबार, मृत व्यक्तींच्या नावांचा यादीत असलेला समावेश अशा गोंधळाच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. येत्या सहा महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील लोकसंख्या वाढीचा तसेच नागरिकांच्या स्थलांतराचा वेग मोठा आहे. जो घोळ लोकसभा निवडणुकांदरम्यान पाहायला मिळाला  तो विधानसभा निवडणुकांच्या काळात तरी निस्तरला जाईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

मतदारांसाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता जिल्हा निवडणूक विभागाच्या ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत निवडणुकीच्या महिनाभर अगोदर ठाणे जिल्ह्यात विविध मतदान जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. बाईक रॅली, मॅरेथॉन आणि प्रभात फेरी यासारख्या विविध गोष्टींचे आयोजन करून जिल्हा निवडणूक विभागाने नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने मतदानाच्या दिवशी बाहेर येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये नागरिक मतदान करण्यासाठी मोठय़ा उत्साहाने बाहेर पडले खरे, मात्र त्यापैकी अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

मतदार याद्यांमधील गोंधळ, केंद्रांवर पुरेशी माहिती पुरविण्यात प्रशासनाला येणारे अपयश, केंद्रांवरील अपुऱ्या सुविधा यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्य़ातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीनही मतदारसंघांमध्ये मतदान व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी जिल्ह्य़ातील ६ हजार ७१५ मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या आणि सुरळीततेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कागदोपत्री प्रशासनाच्या सज्जतेचे आकडे जरी दिले, तरी प्रत्यक्षात मात्र मतदानाच्या दिवशी ही तयारीही किती तोकडी आहे हे लक्षात आले.

डिजिटल भारताचा गवगवा एकीकडे सुरू असला तरी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी अ‍ॅपची मदत घेणाऱ्या अनेकांच्या पदरी निराशा पडली. अनेक मतदारांनी त्यांच्या नावाची पडताळणी न करता थेट मतदान केंद्र गाठले. मतदान केंद्रांवर पोहचल्यावर आपले नाव मतदार यादीतून गहाळ झाल्याचे लक्षात आले. बाईक रॅली आणि मॅरेथॉनचे आयोजन निवडणूक विभागाने करण्याऐवजी ऑनलाइन मतदार यादीत नाव कसे शोधायचे याची घरोघरी जाऊन निवडणूक विभागाने जनजागृती केली असती तर मतदान अधिक सुलभ झाले असते, अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी दिली. मतदान दिवसाच्या तीन दिवस आधी मतदार पावत्या वाटण्याची घोषणा निवडणूक आयोगाने यावेळी देखील केली. प्रत्यक्षात या पावत्या अनेक ठिकाणी मतदारांपर्यंत पोहचल्याच नाहीत. राजकीय पक्षांच्या मतदान केंद्राबाहेरील बूथवर बूथचालक मतदानाकरिता येणाऱ्या मतदाराला एका कागदी चिठ्ठीवर मतदान केंद्रातील बूथ क्रमांक लिहून देत असत. त्यानंतर मतदाता मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदानाच्या रांगेत उभे राहत असे. मतदान केंद्रांबाहेर चिठ्ठय़ा देण्यासाठी निवडणूक विभागातर्फे यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र अनेक मतदारांना यंत्रणेमार्फतही चिठ्ठय़ा मिळत नव्हत्या. मतदान यंत्रावरील उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर सात सेकंदाच्या कालावधीत व्हीव्हीपॅट यंत्रावर मतदान केल्याची चिठ्ठी दिसते. या प्रक्रियेमुळे मतदानासाठी वेळ लागत होता. परिणामी मतदानकेंद्राच्या बाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. ठाणे आणि लोकसभा मतदारसंघातील लुईसवाडी आणि श्रीरंग भागात मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे यंत्रणा सुरळीत होईपर्यंत मतदारांच्या बाहेर रांगा लागल्या. मतदान केंद्रावर पुरुष, स्त्रिया, अपंग अशा तीन रांगा लावण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचनेलाही हरताळ फासल्याचे दिसून आले. काही ठिकाणी एकाच कुटंबातील आणि एकाच पत्त्यावर राहणाऱ्या चार मतदारांना वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करावे लागले. काही कुटंबातील मतदारांची नावे हयात असतानाही यादीतून गहाळ झाल्याचे आढळून आले. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळाली. काही मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध नसल्याचे मतदारांनी सांगितले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेलार गाव येथील मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांना मतदान केंद्राजवळील उघडय़ा गटाराच्या परिसरातच कर्तव्य बजवावे लागल्याचे पाहायला मिळाले. ठाणे लोकसभा मतदारसंघात ४९.९५ टक्के,  भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५३.६८ टक्के, कल्याण लोकसभा मतदारसंघात ४४.२७ टक्के मतदान झाले. मतदारांनी मतदानाच्या अगोदर मतदार यादीत नाव शोधून त्याची शहानिशा केली असती आणि त्यासाठी निवडणूक विभागाने योग्य जनजागृती केली असती तर तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये अजून वाढ झाली असती, असे तीनही लोकसभा मतदारसंघांतील मतदारांकडून सांगण्यात आले आहे.