News Flash

१०० कोटी पाण्यात?

 ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या आघाडीवर कळवा, दिवा, मुंब्रा हे परिसर नेहमीच मागासलेले समजले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

जयेश सामंत

नियोजनाअभावी फसलेल्या दिवा, मुंब्य्राच्या पाणीयोजनेवर आणखी खर्च

मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दहा वर्षांपूर्वी आखलेली पाणीपुरवठा योजना नियोजनाच्या अभावामुळे पूर्णपणे फसली असताना या योजनेसाठी आणखी १०० कोटी रुपये खर्च करण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. हा प्रकल्प नव्या स्वरूपात उभा करण्याचे मनसुबे रचताना पालिकेने या कामाच्या खर्चात भाववाढीचीही तरतूद केली आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी ९७ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प २०० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या आघाडीवर कळवा, दिवा, मुंब्रा हे परिसर नेहमीच मागासलेले समजले जातात. या भागांतील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत असून दिवा तसेच आसपासच्या भागात बडय़ा बिल्डरांचे गृहप्रकल्पही उभे राहात आहेत. या ठिकाणी सध्या १०१ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पालिकेमार्फत केला जातो. या भागातील लोकसंख्या साडेपाच लाखांहून अधिक असून माणशी १७८ लिटर या प्रमाणानुसार पाणीवितरणाचे हे गणित समाधानकारक आहे. मात्र, मुंब्रा आणि दिवा भागातील सदोष वितरण व्यवस्थेमुळे आजही या भागांत पाणीटंचाई जाणवते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने २०१०मध्ये मुंब्रा आणि दिव्यासाठी पाणीपुरवठा सुधारणा कार्यक्रम राबवण्याचे जाहीर केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दरसूचीनुसार ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार करून तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महापालिकेस या प्रकल्पात आणखी काही सुधारणा कराव्याशा वाटल्या आणि १२० कोटी रुपयांना सुधारित प्रकल्प केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेतील मान्यतेसाठी पाठविण्यात आला. केंद्र सरकारच्या कोअर कमिटीने या प्रकल्पास फेब्रुवारी २०१४ मध्ये मंजुरी दिली खरी, मात्र त्यानंतर मे महिन्यात केंद्रात भाजप सरकार येताच हा प्रकल्प पुन्हा मागे पडला. केंद्र सरकारने अमृत योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्यास मान्यता दिली नाही.

याच काळात ठाणे महापालिकेत आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्षांत हा प्रकल्प पुन्हा मागे पडला. दरम्यानच्या काळात जयस्वाल आणि आव्हाड यांच्यात भाजपच्या एका नेत्याने समेट घडवून आणल्याने कळवा-मुंब्र्यात विकासाची गंगा वाहू लागली असून केंद्र सरकारने अमृत योजनेत झिडकारलेला मुंब्रा-दिव्यातील पाणीपुरवठा प्रकल्प महापालिकेने स्वतच्या खर्चातून करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी अभियांत्रिकी विभागाने नव्याने अंदाजपत्रक तयार केले असून आठ वर्षांपूर्वी ९७ कोटी रुपयांचा आखण्यात आलेला या प्रकल्पाचा खर्च १९७ कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. याशिवाय या कामात भाववाढीचा खर्चही नमूद करण्यात आल्याने प्रत्यक्ष प्रकल्प खर्च निविदा प्रक्रियेनंतर २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे. या संदर्भात शहर अभियंता अनिल पाटील यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या कामांचा अंतर्भाव

* महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीतून २०० ते १००० मीलीमीटर व्यासाची मुख्य वितरण वाहिनी टाकणे.

* पाणी वितरणासाठी उंच जलकुंभ बांधणे.

* २३ झोनसाठी नव्याने जलवाहिन्या तसेच वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण करणे.

* प्रकल्पांसाठी आनुषंगिक कामे करणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:12 am

Web Title: more expenditure on on waterlogging in mumbra
Next Stories
1 मंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस!
2 गणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक
3 करवसुलीसाठी महापालिका दारोदारी
Just Now!
X