News Flash

१५० पेक्षा अधिक इमारतींचा पुनर्विकास

जुन्या ठाण्यातील ३४ रस्त्यांच्या रुंदीकरणास मान्यता

(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता

ठाणे : जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी अधिकाधिक चटईक्षेत्र मिळावे यासाठी अरुंद रस्त्यांच्या रुंदीकरणास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे नौपाडा, पाचपाखाडी, चरई, विष्णुनगर या भागातील जवळपास १५० पेक्षा अधिक इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग आता खुला होऊ शकणार आहे. महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेल्या मूळ प्रस्तावात जेमतेम ११ रस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. शहरातील वास्तुविशारद, विकासक, स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ३४ रस्त्यांची सुधारित यादी पाठविण्यात आली. त्यापैकी चार रस्ते प्रलंबित ठेवत उर्वरित रस्त्यांच्या रुंदीकरणास मान्यता देण्यात आल्याने अतिरिक्त टीडीआर आणि प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रासह पुनर्विकासासाठी व्यवहार्य ठरेल इतके चटईक्षेत्र आता पदरात पाडून घेता येणार आहे.

राज्य सरकारने मध्यंतरी एका आदेशानुसार नऊ मीटरपेक्षा कमी रुंद असलेल्या रस्त्यांलगत उभ्या असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर वापरास चाप लावला होता. याचा मोठा फटका जुन्या ठाण्यातील विशेषत: नौपाडा, पाचपाखाडी, चरई या भागात उभ्या असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासास बसला होता. जुन्या ठाण्यातील बहुतांश इमारतींना लागून विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी नाही. बहुतांश रस्त्यांची रुंदी जेमतेम चार ते सहा मीटरच्या घरात भरते. त्यामुळे या रस्त्यांना लागून असलेल्या अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर वापराचा पर्याय खुंटला होता. हा पर्याय आता खुला झाल्याने महापालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या किमान १५० इमारतींच्या पुनर्विकासातील मुख्य अडसर दूर होणार आहे.

याशिवाय महापालिकेच्या मूळ प्रस्तावात नमूद असलेल्या ११ रस्त्यांमध्ये तब्बल २१ नव्या रस्त्यांची भर घालण्यात आली असून राबोडी तसेच कळव्यातील काही इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही यानिमित्ताने प्रशस्त करून देण्यात आला आहे.

प्रस्तावित रस्त्यांची यादी

रामवाडी (विष्णुनगर) येथील सारस्वत बँक ते वीर बाजी प्रभू देशपांडे मार्ग, हिंदू कॉलनी ए अनमोल हाईटस् ते यज्ञेश्वर सोसायटी, हिंदूू कॉलनी-बी(अत्रे कट्टा) ते पंपिग स्टेशन रोड, बी केबिन रोड-शिवाजीनगर नौपाडा मार्ग, बी कॅबिन ते रेल्वे कॉलनी, शेलारपाडा (कोलबाड)- राजश्रीधाम सोसायटी ते शेलारपाडा, पेंडसे लेन (ब्राह्मण सोसायटी), देवधर रुग्णालय ते सहकार सोसायटी लेन, विष्णुनगर ते लेन नंबर २, विष्णुनगर ते लेन नंबर ३, सहयोग मंदिर लेन, घंटाळी क्रॉस लेन ते आर.बी.एल बँक ते कल्पना सहनिवास सोसायटी, काका सोहनी पथ, राम मारुती क्रॉस लेन ते डीएनएस बँक ते नालंदा सोसायटी, महर्षी कर्वे मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग- गोखले रोड ते दया क्षमा शांती सोसायटी, गावंड पथ (भास्कर कॉलनी), राबोडी १- पहिली राबोडी नाका ते रेहमानी हॉटेल ते जनरल कब्रस्तान प्रवेशद्वारापर्यंत, राबोडी १ महापालिका व्यायाम शाळा ते कत्तलखान्यापर्यंत, मदनलाल धिंग्रा मार्ग- परिजात सोसायटी ते अमरज्योती सोसायटी, खारटन वसाहत येथील रस्ता, साने गुरुजी पथ येथील अंबिका भवन ते सुनीता को. ऑप. संकुलपर्यंतचा रस्ता, गोखले रोड येथील ब्राह्मण सोसायटीजवळील कै.गांगल मार्ग, गोखले रोड येथील ब्राह्मण सोसायटीमधील हितवर्धनी पथ, प्रभाग क्रमांक ११ मधील गोल्डन पार्क नाका ते मुक्ताईनगर मार्गपर्यंतचा रस्ता, कोटीलिंगेश्वर रोड बी केबिन, हॉलीक्रॉस शाळेच्या मागे ते काझी आपार्टमेंट ते दत्त मंदिर, शिवाजी महाराज चौक ते कळवा मेडिकल ते सहकार बाजार इमारत, एसबीआय ते डॉ. मुंजे बंगला, नौपाडय़ातील पानसरे बंगला ते  विष्णुनगर येथील डॉ. मुंजे हॉस्पिटल, सरस्वती शाळा ते दया क्षमा शांती इमारत ते सेवा रस्ता, एदलजी रोड ते एल.बी.एस. रोड

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे जुन्या ठाण्यातील १५० पेक्षा अधिक अधिकृत धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होऊ शकणार आहे. यापूर्वी हे प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य नव्हते. नव्या निर्णयामुळे टीडीआर आणि प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्राचा वापर अधिक शक्य असल्याने प्रकल्प व्यवहार्य ठरतील. शिवाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूंकडील रुंदीकरणामुळे नौपाडा आणि आसपासच्या परिसराचे नव्याने नियोजन शक्य होणार आहे.
– मकरंद तोरसकर, वास्तुविशारद

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या मूळ प्रस्तावात जेमतेम ११ रस्त्यांचा समावेश होता. गेल्या दीड ते दोन वर्षांत या भागातील रहिवासी, वास्तुविशारद, अधिकारी, विकासकामांच्या बैठकांनंतर अनेक नव्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नौपाडा, विष्णुनगर तसेच आसपासचा परिसर पूर्णपणे यामध्ये समाविष्ट होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
– नरेश म्हस्के, महापौर ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 3:13 am

Web Title: more than 100 buildings redevelopment dd70
Next Stories
1 चटई क्षेत्रावर डोळा
2 २८ हजार खाटा रिकाम्या
3 ठाणे जिल्ह्यतील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
Just Now!
X